टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने १२ षटाकर ठोकले. यशस्वीने राजकोट कसोटीच्या दुसऱ्या डावात २१४ धावांची खेळी केली. यामुळे भारताने राजकोट कसोटीत ४३४ धावांनी जिंकली.
या मालिकेत आतापर्यंत यशस्वी जैस्वालने २२ षटकार मारले आहेत. या कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा तो फलंदाज ठरला आहे. मालिकेत अजून दोन सामने बाकी आहेत. पण असे अनेक महान फलंदाज आहेत जे आपल्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत इतके षटकार ठोकू शकले नाहीत.जितके जैस्वालने केवळ मालिकेतील या तीन सामन्यात ठोकले आहेत.
हाशिम आमला हा क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाजांमध्ये गणला जातो. अमलाने १२४ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत ९२८२ धावा केल्या आहेत. २०१९ मध्ये शेवटची कसोटी खेळणाऱ्या आमलाने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत केवळ १४ षटकार मारले.
स्टीव्ह वॉ हा कसोटी इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याची फलंदाजीही अप्रतिम होती. कसोटीत १० हजारांहून अधिक धावा करणाऱ्या १४ फलंदाजांच्या यादीत वॉचेही नाव सामील आहे. ३२ शतके झळकावणाऱ्या वॉला त्याच्या कसोटी कारकिर्दीत केवळ २० षटकार मारता आले.
जेव्हा जेव्हा टीम इंडिया कसोटीत कठीण परिस्थितीत असायची तेव्हा व्हीव्हीएस लक्ष्मण हा संकटमोचक बनायचा. त्याने भारतासाठी अनेक ऐतिहासिक खेळी खेळल्या. लक्ष्मणने १३४ कसोटीत ८७८१ धावा केल्या. त्याच्या नावावर १७ शतके आहेत, मात्र त्याने कसोटी करिअरमध्ये केवळ ५ षटकार मारले आहेत.
ॲलिस्टर कुकने १६१ कसोटी सामन्यांच्या २९१ डावांमध्ये फलंदाजी केली. २९१ डावांत त्याला केवळ ११ षटकार मारता आले. राजकोट कसोटीच्या एका डावात यशस्वीने १२ षटकार ठोकले. कुकने इंग्रजी माध्यमांशी बोलताना या गोष्टीचा उल्लेखही केला आहे.
राहुल द्रविडची गणना भारतातीलच नव्हे तर जगातील महान फलंदाजांमध्ये केली जाते. त्याच्या नावावर केवळ कसोटीच नाही तर एकदिवसीय क्रिकेटमध्येही १० हजारांहून अधिक धावा आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने २२ चेंडूत अर्धशतक केले आहे. पण द्रविडच्या कसोटी कारकिर्दीत फक्त २१ षटकार आहेत.
संबंधित बातम्या