वेगवान गोलंदाज यश दयाल लवकरच भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
हा तोच यश दयाल आहे, ज्याच्या चेंडूवर रिंकू सिंगने IPL २०२३ मध्ये मध्ये ५ षटकार ठोकले होते. यानंतर यश दयाल खचून गेला होता आणि त्याचे १० किलो वजन कमी झाले होते.
या घटनेनंतर यश दयालसोबत आयपीएल २०२४ मध्येही एक घटना घडली. यावेळी यश दयालने धावांचा योग्य रितीने बचाव केला आणि संघाला सामना जिंकून दिला. विशेष म्हणजे, त्याने एम एस धोनी फलंदाजीला असताना अप्रतिम गोलंदाजी केली. धोनीने त्याच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता, पण यानंतर पुढच्या चेंडूवर त्याने धोनीला बाद केले आणि हिरो बनला.
वास्तविक, १८ मे २०२४ रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील सामना झाला होता. हा सामना देखील महत्वाचा होता कारण विजयाची नोंद करून, RCB ने CSK ला प्लेऑफमध्ये जाण्यापासून वंचित ठेवले होते.
त्या सामन्याचे शेवटचे षटक टाकण्यासाठी यश दयाल आला होता, ज्याच्या पहिल्याच चेंडूवर एमएस धोनीने ११० मीटर लांब षटकार मारला. त्यानंतर विराट कोहली यश दयालकडे आला आणि त्याने त्याला एक खास सल्ला दिला. यानंतर या सल्ल्याने पुढच्याच चेंडूवर धोनी बाद झाला.
आता एक नवीन अपडेट समोर आले आहे की एमएस धोनीला बाद करणारा चेंडू टाकण्यापूर्वी विराट कोहलीने यश दयालला काय सल्ला दिला होता?
एका चॅनेलच्या वृत्तानुसार, यश दयालने सांगितले, की "विराट भाईने मला सांगितले होते की एमएस धोनीला वेगवान चेंडू आवडतात. त्यामुळे तु चेंडूला गती देऊ नकोस.
पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर विराट भाईने मला शांत केले आणि त्याच्याशी बोलल्यानंतर दबाव कमी झाला आणि थोडं छान वाटलं."
यश दयालसाठी आयपीएल २०२४ फारसे चांगले नसले तरी संपूर्ण हंगामात तो आरसीबीसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्याने या मोसमात १४ सामन्यांत १५ विकेट घेतल्या. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळेल, अशी आशा आता तो करत असेल.