WTC Points Table : बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडने भारताचा ८ विकेट्सने पराभव केला. न्यूझीलंडने ३६ वर्षांनंतर भारतीय भूमीवर कसोटी सामना जिंकला आहे. या विजयासह किवी संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत इंग्लंडला मागे टाकले आहे. भारताचेही नुकसान झाले आहे.
भारताविरुद्धच्या विजयानंतर न्यूझीलंडचा संघ ४४.४४ गुणांसह चौथ्या स्थानावर आला आहे. तर इंग्लंड संघ ४३.०६ पीसीटीसह पाचव्या स्थानावर आहे. भारताचे काही गुण कमी झाले आहेत, पण टीम इंडिया अजूनही पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचे आता ६८.०६ गुण आहेत. दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचे ६२.५० गुण आहेत.
WTC च्या चालू चक्रात, टीम इंडियाने आतापर्यंत एकूण १२ कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी ८ जिंकले आहेत आणि ३ गमावले आहेत.
भारतीय संघाला अद्याप न्यूझीलंडविरुद्ध २ आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ कसोटी सामने खेळायचे आहेत. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचयचे असेल, तर बाकीच्या ७ पैकी ४ टेस्ट मॅच कोणत्याही किंमतीत जिंकावे लागतील. अशा परिस्थितीत टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धचे दोन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे दोन कसोटी सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील.
जर टीम इंडियाने ४ कसोटी जिंकल्या तर त्याचा पीसीटी ६४.०३ असेल, जो अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पुरेसा असेल. सातपैकी ५ सामने जिंकल्यास टीम इंडियाचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. सर्वात मोठी अडचण ही आहे. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर बॉर्डर-गावस्कर मालिका खेळायची आहे.
याआधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे दोन अंतिम सामने खेळले गेले आहेत. मात्र एकदा न्यूझीलंड आणि एकदा ऑस्ट्रेलियाने भारताचा WTC फायनलमध्ये पराभव केला आहे. यावेळीही भारतीय संघ WTC फायनलमध्ये स्थान मिळवण्याचा प्रबळ दावेदार आहे.