श्रीलंकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडचा २-० असा धुव्वा उडवला. मालिकेतील दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेने न्यूझीलंडचा एक डाव आणि १५४ धावांनी पराभव केला. यासह संघाने २ कसोटी सामन्यांची मालिका जिंकली.
श्रीलंकेने मालिकेतील पहिली कसोटी ६३ धावांनी जिंकली होती. दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेच्या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. श्रीलंकेच्या विजयामुळे भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.
कसोटी मालिकेत न्यूझीलंडला क्लीन स्वीप केल्यानंतर डब्ल्यूटीसी पॉइंट्स टेबलमध्ये श्रीलंकेचे स्थान मजबूत झाले आहे. श्रीलंका संघ आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. संघाने आतापर्यंत ९ सामने खेळले असून ५ जिंकले आहेत. तर श्रीलंकेने ४ सामन्यांमध्ये पराभवाचे तोंड बघितले आहे. त्यांचे सध्या ६० गुण आहेत आणि विजयाची टक्केवारी ५५.५५ आहे.
सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघ पहिल्या तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. पण श्रीलंकाही या दोन संघांपासून दूर नाही.
श्रीलंकेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ सायकलमध्ये ४ कसोटी सामने खेळायचे आहेत. श्रीलंका दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-२ कसोटी खेळणार आहे.
अशा स्थितीत त्यांच्याकडे डब्ल्यूटीसी फायनल खेळण्याची चांगली संधी आहे. अंतिम सामना WTC पॉइंट टेबलमधील टॉप-२ संघांमध्ये खेळला जातो. सध्या अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय संघाने १० पैकी ७ सामने जिंकले आहेत.
टीम इंडियाला २ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला असून १ सामना अनिर्णित राहिला आहे. दुसरीकडे, कांगारू संघाने १२ पैकी ८ सामने जिंकले आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीनंतर डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलची स्थिती अधिक स्पष्ट होईल.