WTC Points Table : पाकिस्तान संघाने इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना अवघ्या तीन दिवसांत जिंकला. यासोबतच पाकिस्तानने मालिकाही २-१ ने खिशात घातली. रावळपिंडीच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात केवळ ११२ धावांवर गारद झाला. अशा स्थितीत चौथ्या डावात पाकिस्तान संघाला केवळ ३६ धावांचे लक्ष्य मिळाले आणि त्यांनी ते अवघ्या ३ षटकात गाठत सामना ९ विकेटने जिंकला.
या कसोटीत पाकिस्तानी संघाच्या विजयाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. विशेष म्हणजे या सामन्यातील पराभवानंतरही इंग्लंड संघ सहाव्या स्थानावर आहे, तर पाकिस्तानने सुधारणा केली आहे.
पाकिस्तान संघाने दीर्घ कालावधीनंतर मायदेशात कसोटी मालिका जिंकण्यात यश मिळवले आहे. अशा परिस्थितीत संघ आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत ७ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. ज्यात त्याच्या गुणांची टक्केवारी ३३.३३ आहे. याशिवाय आता बांगलादेशचा संघ आठव्या स्थानावर पोहोचला आहे, तर वेस्ट इंडिजचा संघ ९व्या स्थानावर आहे.
तर इंग्लंड सहाव्या स्थानावर आहे आणि त्यांच्या गुणांची टक्केवारी ४०.७९ आहे. या कसोटी मालिकेतील पराभवानंतर आता इंग्लंडला या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे जवळपास सर्व दरवाजे बंद झाले आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत, भारत आणि ऑस्ट्रेलिया टॉप-2 मध्ये कायम आहेत, ज्यामध्ये भारतीय ६८.०६ पीसीटीसह अव्वल स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलियन संघ ६२.५० पीसीटीसह दुसऱ्या स्थानावर आहे.
याशिवाय श्रीलंका तिसऱ्या स्थानावर तर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानला दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध अजून २-२ कसोटी मालिका खेळायच्या आहेत.
संबंधित बातम्या