भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २८० धावांनी जिंकला. यासह टीम इंडियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. चेन्नई कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात बांगलादेशसमोर ५१५ धावांचे मोठे लक्ष्य होते, परंतु खेळाच्या चौथ्या दिवशी ते दुसऱ्या डावात २३४ धावांवर गारद झाले.
टीम इंडियाच्या या विजयामुळे २०२३-२५ च्या वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठे बदल झाले आहेत. गुणतालिकेत भारतीय संघाने पहिल्या स्थानावर राहून आपले स्थान मजबूत केले आहे, तर बांगलादेशला या पराभवामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.
चेन्नई कसोटीनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ च्या गुणतालिकेत टीम इंडिया सध्या ७१.६७ इतक्या विजयी टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ ६२.५० टक्केवारीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई कसोटी सामन्यातील पराभवामुळे बांगलादेश संघाला नुकसान सहन करावे लागले असून ते आता सहाव्या स्थानावर घसरले आहेत. त्यांच्या विजयाची टक्केवारी ३९.२९ इतकी आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी बांगलादेशचा संघ WTC च्या गुणतालिकेत इंग्लंड आणि श्रीलंकेच्या वर होता पण आता तो या दोघांच्याही खाली घसरला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीत भारतीय संघाच्या विजयामुळे, श्रीलंका संघ आता WTC २०२३-२५ च्या गुणतालिकेत ४२.८६ टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे. तर इंग्लंड ४२.१९ टक्केवारीसह पाचव्या स्थानावर आहे. न्यूझीलंड संघ सध्या ५० टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर शेवटचे तीन स्थानांवर दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजचे संघ विराजमान आहेत.