WTC 2023-25: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. या मालिकेत भारताचा स्टार युवा फलंदाज यशस्वी जैस्वालकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत यशस्वी जैस्वालने दमदार कामगिरी केली. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने दोन द्विशतकांच्या मदतीने ७१२ धावा केल्या. या कामगिरीसह त्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले. बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत त्याच्याकडे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या एका आवृत्तीत भारतासाठी सर्वाधिक करणाऱ्या अजिंक्य रहाणेचा विक्रम मोडण्यापासून एक पाऊल दूर आहे. याशिवाय, जो रूटला टाकण्यासाठी त्याच्याकडे सुवर्णसंधी आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यादरम्यान यशस्वी जैस्वालला इतिहास रचण्याची संधी मिळणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या एका आवृत्तीत भारतासाठी अजिंक्य रहाणेचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्यासाठी जैस्वाल फक्त १३२ धावा दूर आहे. अजिक्य राहणेने डब्लूटीसीच्या (२०१९-२१) एका आवृत्तीत १८ सामन्यांमध्ये १ हजार १५९ धावा केल्या. तर, जैस्वालने अवघ्या नऊ सामन्यांत १०२८ धावा केल्या आहेत.
१) अजिंक्य रहाणे- १ हजार १५९ धावा (२०१९-२१)
२) रोहित शर्मा- १ हजार ०९४ धावा (२०१९-२१)
३) यशस्वी जैस्वाल- १ हजार ०२८ धावा (२०२३-२५)
४) विराट कोहली- ९३४ धावा (२०१९-२१)
५) विराट कोहली- ९३२ धावा (२०२३-२५)
डब्लूटीसीच्या चालू हंगामात जो रूटने आतापर्यंत १६ सामन्यात ५३.७६ च्या सरासरीने एकूण १ हजार ९८ धावा केल्या आहेत, ज्यात पाच शतक आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. यशस्वी जैस्वालने बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत ३७१ धावांचा पल्ला ओलांडला तर तो डब्लूटीसीच्या चालू हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहचेल.