Mumbai Indians Women vs Delhi Capitals Women : महिला प्रीमियर लीग २०२४ चा थरार आज शुक्रवारपासून (२३ फेब्रुवारी) सुरू होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि गेल्या मोसमातील उपविजेता दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. ५ संघांच्या स्पर्धेचा हा दुसरा हंगाम आहे.
WPL 2024 मध्ये मागील वेळेप्रमाणे या वेळीही एकूण २२ सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेतील सर्व २२ सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजेपासून खेळवले जातील. या स्पर्धेचा अंतिम सामना १७ मार्च रोजी होणार आहे.
WPL चा सलामीचा सामना आज बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स एकमेकांना भिडणार आहेत. अशा परिस्थितीत WPL च्या सलामीच्या सामन्यात कोणते खेळाडू आपल्या कामगिरीने चाहत्यांना प्रभावित करू शकतात, याबाबत जाणून घेणार आहोत.
मुंबई इंडियन्सची उजव्या हाताची मध्यमगती गोलंदाज इझी वाँगने महिला प्रीमियर लीग २०२३ मध्ये तिच्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. आता आजच्या सामन्यात ती दिल्ली कॅपिटल्ससाठी खतरा बनू शकते.
भारतीय संघाची युवा गोलंदाज तीतास साधूने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही नाव कमावले आहे. ती दिल्ली कॅपिटल्ससाठी किफायतशीर ठरू शकते.
दिल्ली कॅपिटल्स आणि भारतीय संघाची स्टार फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्स देखील सलामीच्या सामन्यात तिच्या तुफानी फलंदाजीने चमत्कार करू शकते. आतापर्यंत तिने भारतासाठी ९२ सामन्यांत १९४४ धावा केल्या आहेत. या काळात जेमीने १० अर्धशतके झळकावली आहेत.
भारतीय संघाची अनुभवी फलंदाज आणि मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर पहिल्या सामन्यात चमक दाखवू शकते. ती एक अप्रतिम फलंदाज आहे. हरमनप्रीतने भारतासाठी आतापर्यंत १६१ टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तिने ३२०४ धावा केल्या आहेत.
दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार आणि अनुभवी फलंदाज मेग लॅनिंगचे कौतुक शब्दांमध्ये करता येणार नाही. मेगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १३२ टी-20 सामन्यांमध्ये ३४०५ धावा केल्या आहेत. या काळात तिच्या बॅटमधून २ शतके आणि १५ अर्धशतकेही झळकली आहेत.
संबंधित बातम्या