महिला प्रीमियर लीग २०२४ मधील लीग फेरीचे सामने पूर्ण झाले आहेत. साखळी फेरीतील शेवटचा सामना गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ७ विकेट्सनी विजय मिळवला.
विशेष म्हणजे, या विजयासह दिल्ली कॅपिटल्स थेट फायनलमध्ये पोहोचली आहे. सोबतच महिला प्रीमियर लीग 2024 च्या प्लेऑफ फेरीचे सामनेही निश्चित झाले आहेत. यात एका संघाने थेट फायनलमध्ये धडक मारली आहे. तर दोन संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळला जाईल.
दिल्ली कॅपिटल्सने लीग फेरीत सर्वाधिक सामने जिंकले असून गुणतालिकेत अव्वल आहेत. यामुळे त्यांनी थेट फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर गुणतालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमाकावरील संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळला जाईल. या सामन्यातील विजेता संघ फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सला भिडेल.
एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संघ आमनेसामने असतील. मुंबई इंडियन्स संघ साखळी फेरीनंतर पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे.
मुंबई इंडियन्सने साखळी टप्प्यातील ८ पैकी ५ सामने जिंकले आणि ३ सामने गमावले. त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ८ पैकी ४ सामने जिंकले आणि तेवढेच सामने गमावले.
महिला प्रीमियर लीग २०२४ चा एलिमिनेटर सामना १५ मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाईल. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.
त्याचबरोबर हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सला भिडणार आहे. या मोसमातील अंतिम सामना १७ मार्च रोजी होणार आहे. हा सामनाही दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजेपासून खेळले जातील.
संबंधित बातम्या