न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा १७२ धावांनी धुव्वा उडवला. यासह ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. कॅमेरून ग्रीनने फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली. तर फिरकी गोलंदाज नॅथन लायनने गोलंदाजीत कमाल केली. त्याच्यामुळेच ऑस्ट्रेलियन संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला.
कॅमेरून ग्रीनने या सामन्याच्या पहिल्या १७४ धावांची शानदार खेळी केली तर नॅथन लायनने सामन्यातील पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ६ असे एकूण १० विकेट घेतल्या.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या या विजयाने टीम इंडियाचा मोठा फायदा झाला आहे. वास्तविक, टीम इंडिया आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना गमावल्यानंतर न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतील अव्वल स्थान गमावले आहे. न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या पराभवामुळे न्यूझीलंडचे विजयाची टक्केवारी ६० टक्के झाली आहे. भारतीय संघाचे ६४.५८ गुण आहेत. तर ऑस्ट्रेलियन संघ तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाचे ५९.०९ टक्के गुण आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३८३ धावा केल्या होत्या. कॅमेरून ग्रीनने संघाकडून १७४ धावांची खेळी केली. तर मिचेल मार्शने ४० धावांचे योगदान दिले.
यानंतर न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात अवघ्या १७९ धावांत सर्वबाद झाला. यानंतर ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या डावात १६४ धावांवर गारद झाला. पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला ३६९ धावांचे लक्ष्य दिले होते, पण याच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ १९६ धावांवर ऑलआऊट झाला.