ICC ने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम सामन्याची तारीख जाहीर केली आहे. इंग्लंडचे ऐतिहासिक मैदान असलेल्या लॉर्ड्सवर ११ ते १६ जूनदरम्यान अंतिम सामना खेळवला जाईल. १६ जून हा राखीव दिवस म्हणून ठेवला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासातील हा तिसरा अंतिम सामना असेल आणि लॉर्ड्सवर पहिल्यांदाच विजेतेपदाची लढत होणार आहे.
WTC ची पहिली फायनल २०२१ मध्ये साउथॅम्प्टन येथे खेळली गेली होती, तर २०२३ च्या विजेतेपदाची लढत ओव्हल मैदानावर झाली होती.
आतापर्यंत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने अनुक्रमे २०२१ आणि २०२३ मध्ये हे विजेतेपद पटकावले आहे. दोन्ही वेळा भारताला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
टीम इंडियाला पहिल्यांदा न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यानंतर २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले.
२०२५ चा अंतिम सामना कोणत्या संघांमध्ये खेळवला जाईल हे अद्याप निश्चित झालेले नाही. सध्या गुणतालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. येत्या काही महिन्यांत सर्वच संघ भरपूर कसोटी सामने खेळणार आहेत, त्यानंतर कोणते संघ WTC फायनल खेळणार हे निश्चित होईल.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे भारत पुन्हा अंतिम फेरीची दावेदार मानली जात आहे. भारताला अजून १० कसोटी सामने खेळायचे आहेत.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका या महिन्यापासून सुरू होणार आहे. दोन्ही संघातील पहिला सामना १९ सप्टेंबर रोजी चेन्नई येथे होणार आहे. यानंतर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारताला त्यांच्याविरुद्ध ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
यानंतर टीम इंडिया नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ५ कसोटी सामने होणार आहेत. म्हणजेच भारतीय संघाची खरी कसोटी ऑस्ट्रेलियाविरुद्ध असेल.
ही मालिका टीम इंडिया फायनल खेळणार की नाही हे ठरवेल, असे मानले जात आहे. ऑस्ट्रेलियन संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, त्यामुळे तेही WTC फायनलचे दावेदार आहेत.