महिला टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये भारताचा पुढील सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना रविवारी (१२ ऑक्टोबर) संध्याकाळी शारजाहमध्ये रंगणार आहे. टीम इंडियाचा हा शेवटचा ग्रुप सामना असेल. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल.
जर ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला तर टीम इंडियासाठी पुढची परिस्थिती प्रचंड कठीण होईल. अशा स्थितीत भारताचे उपांत्य फेरीचे समीकरण कठीण होणार आहे.
अ गटातील गुणतालिकेवर नजर टाकली तर ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. त्यांनी तीन सामने खेळले आहेत आणि सर्व जिंकले आहेत. त्यांचे ६ गुण आहेत. भारताला हरवल्यास उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान निश्चित होईल. टीम इंडिया जिंकली तर सेमी फायनच्या आशा कायम असतील.
दरम्यान, टीम इंडियाला नुसता विजय नाहीतर चांगला फरकाने सामना जिंकावा लागेल. जेणेकरून नेट रनरेट इतर संघांपेक्षा चांगला होईल. भारताचे सध्या ३ सामन्यात ४ गुण आहेत, जे ऑस्ट्रेलियापेक्षा कमी आहेत.
ऑस्ट्रेलियाने भारताला हरवल्यास अडचणी वाढतील. अशा स्थितीत भारताला न्यूझीलंड-पाकिस्तान सामन्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. न्यूझीलंडने पाकिस्तानला हरवावे अशी प्रार्थना टीम इंडियाला करावी लागेल. न्यूझीलंडचे दोन सामने बाकी आहेत. त्यांचे २ गुण आहेत. त्याचबरोबर रन रेटही मायनसमध्ये आहे. पाकिस्तानचा शेवटचा सामना बाकी आहे. त्यांचेही २ गुण आहेत. श्रीलंकेचा संघ आधीच बाहेर पडला आहे.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवले आणि विजयाचे अंतर जास्त नसले तरी अडचणी येतील. भारताला विजयासह ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट पार करावा लागेल.
यासाठी टीम इंडियाला मोठा विजय नोंदवावा लागणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.