Women’s T20 WC Points Table : आयसीसी महिला टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव करून स्पर्धेतील पहिला सामना जिंकला. दुबईत खेळल्या गेलेल्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग थोडासा सुकर झाला आहे.
या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या १०५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने ४ विकेट्सच्या मोबदल्यात आणि १८.५ षटकात हा सामना जिंकला.
अशा परिस्थितीत, पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया उपांत्य फेरीत कशी प्रवेश करू शकते हे आपण येथे जाणून घेणार आहोत.
वास्तविक, टी-20 विश्वचषक 2024 मधील पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता, परंतु पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने अप्रतिम गोलंदाजी करत पाकिस्तानला १०५ धावांवर रोखले.
भारताकडून अरुंधती रेड्डीने ३ बळी घेतले. श्रेयंकाने २, तर रेणुका, दीप्ती आणि आशा यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. फलंदाजी करताना शेफाली वर्माने सर्वाधिक ३२ धावा केल्या.
आता पाकिस्तानविरुद्ध ६ विकेटने विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ उपांत्य फेरी गाठण्याच्या मार्गावर आहे. उपांत्य फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी टीम इंडियाला आपल्या ग्रुप स्टेजचे उर्वरित सामने जिंकावे लागतील. भारताला श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही किंमतीत विजय मिळवावा लागेल.
विजयासोबत त्यांचा नेट रनरेटही वाढवावा लागणार आहे. यासाठी भारताला श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील, कारण किवी संघाकडून पराभूत झाल्यानंतर त्यांचा नेट रनरेट बराच कमी झाला होता.
जर टीम इंडियाने सर्व सामने जिंकले आणि न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला हरवले तर भारत आणि न्यूझीलंड उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया महिला टी-20 विश्वचषकाच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. भारताचा नेट रन रेट -१.१२७ आहे. पाकिस्तान संघ तिसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा संघ पाचव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा महिला संघ २ गुणांसह अव्वल स्थानावर आहे.