महिला टी-20 वर्ल्डकपला ३ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. आज (४ ऑक्टोबर) भारतीय महिला क्रिकेट संघ मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. हा सामना सायंकाळी ७:३० वाजता दुबईतील दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे.
पण त्याआधी भारतीय महिला क्रिकेट संघाचा एक खास व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये त्यांचे कुटुंबीय हृदय स्पर्शी व्हिडिओद्वारे खेळाडूंना खास संदेश देताना दिसत आहेत.
खेळाडूंच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मुलींना विशेष शुभेच्छा पाठवल्या आहेत, ज्यामध्ये त्यांनी भारतीय संघाला विश्वचषक जिंकून घरी येण्यासाठी प्रेरित केले. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) जारी केलेल्या व्हिडिओमध्ये भारतीय संघाची महत्त्वाची फलंदाज स्मृती मानधना आपल्या कुटुंबाचा व्हिडिओ पाहून खूप भावूक झाल्याचं पाहायला मिळाले. तिचे आई-वडील आणि भावाने तिला शुभेच्छा दिल्या. यावेळी तिच्या भावाने विनोदीपणे टी-२० विश्वचषकादरम्यान दबाव हाताळण्यासाठी टिप्स दिल्या. यावेळी तिच्या डोळ्यात अश्रू तरळले.
यावेळी कर्णधार हरमनप्रीत कौर हिलादेखील तिच्या कुटुंबाकडून शुभेच्छा मिळाल्या. ज्यामध्ये तिच्या आईने विश्वास व्यक्त केला की हरमनप्रीत तिच्या संघाचे चांगले नेतृत्व करेल आणि ट्रॉफीसह भारतात परतेल.
प्रशिक्षक अमोल मजुमदार यांच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या शुभेच्छा पाठवल्या. त्याची पत्नी म्हणाली, “तुम्ही सर्वांनी या विश्वचषकासाठी खूप मेहनत घेतली आहे. तुमच्या मेहनतीला नक्कीच फळ मिळेल अशी आम्ही प्रार्थना करतो.”
दरम्यान, मजुमदार यांच्या मुलीने तिचे वडील आणि कोचिंग स्टाफचे कौतुक करताना म्हटले की, “बाबा आणि टीमला मैदानावर पाहून आम्हाला अभिमान वाटतो. परिस्थिती कशीही असली तरी तो नेहमी शांत आणि संयमी राहतो."
भारतीय महिला संघ ४ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. या संघाला अ गटात न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि श्रीलंकेसह ठेवण्यात आले आहे.
संबंधित बातम्या