New Zealand W vs South Africa W : महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ बाद १५८ धावा केल्या आहेत.
आता टी-20 वर्ल्डकप जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला २० षटकात १५९ धावा करायच्या आहेत. या सामन्यात न्यूझीलंडकडून सुझी बेट्सने ३२ धावांची, अमेलिया केरने ४३ धावांची आणि ब्रूक हॅलिडेने ३८ धावांची दमदार खेळी केली.
अमेलिया केरने सर्वात मोठी खेळी खेळताना ३८ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या. तर आफ्रिकेकडून नॉनकुलुलेको म्लाबाने सर्वाधिक २ बळी घेतले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. संघाला पहिला धक्का जॉर्जिया प्लिमरच्या रूपाने दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर १६ धावांवर बसला, तिने २ चौकारांच्या मदतीने ९ (७ चेंडू) धावा केल्या.
त्यानंतर सुझी बेट्स आणि अमेलिया केर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३७ धावांची (३६ चेंडू) भागीदारी केली. ही भागीदारी ८व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर संपली जेव्हा सुझी बेट्स ३१ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने ३२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. त्यानंतर संघाला तिसरा धक्का ११व्या षटकात कर्णधार सोफी डिव्हाईनच्या (६) रूपाने बसला.
त्यानंतर ब्रुक हॅलिडे आणि अमेलिया केर यांनी चौथ्या विकेटसाठी ५७ धावांची (४४ चेंडू) भागीदारी केली. ही उत्कृष्ट भागीदारी १८व्या षटकात संपुष्टात आली जेव्हा ब्रुक हॅलिडे २८ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने ३८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली.
यानंतर शानदार खेळी करणाऱ्या अमेलिया केरने ४३ धावा करत पॅव्हेलियनचा रस्ता धरला. त्यानंतर सहाव्या विकेटसाठी मॅडी ग्रीन आणि इसाबेला गेज यांनी ७ चेंडूत १७ धावांची भागीदारी करत संघाला १५८ धावांपर्यंत नेले.
संबंधित बातम्या