महिला टी-20 क्रिकेटला आज (२० ऑक्टोबर) नवा चॅम्पियन मिळणार आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ रविवारी विजेतेपदासाठी आमनेसामने येणार आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही संघांनी यापूर्वी कधीच वर्ल्डकप जिंकलेला नाही. या वर्ल्डकमध्ये सोफी डिव्हाईन न्यूझीलंडचे नेतृत्व करत आहे. तर लॉरा वॉल्वार्ड आफ्रिकेची कर्णधार आहे.
महिला टी-20 वर्ल्डकपची फायनल स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिस्ने हॉटस्टारवर संध्याकाळी ७:३० पासून थेट प्रक्षेपित केला जाईल.
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण १६ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये न्यूझीलंडने ११ वेळा विजय मिळवला आहे. दरम्यान, न्यूझीलंड महिला संघाने २००० मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता परंतु सध्याच्या संघाचा कोणताही सदस्य त्या ऐतिहासिक विजेतेपदाचा भाग नव्हता.
या विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी सलग १० सामन्यांमध्ये पराभवामुळे न्यूझीलंडचा आत्मविश्वास डळमळीत झाला होता, पण डेव्हाईनच्या नेतृत्वाखाली संघाने शानदार पुनरागमन केले. सुझी बेट्स, अमेलिया केर आणि ली ताहुहू या अनुभवी खेळाडूंच्या उपस्थितीचा संघाला फायदा झाला.
डेव्हाईन, बेट्स आणि ताहुहू हे जागतिक स्पर्धेत राष्ट्रीय संघाकडून खेळण्याची कदाचित ही शेवटची वेळ असेल. पस्तीस वर्षीय डेव्हाईनच्या नावावर पांढऱ्या चेंडूत ७,००० हून अधिक धावा आहेत, तर ३७ वर्षीय बेट्सच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० हून अधिक धावा आहेत.
तर वेगवान गोलंदाज ताहुहू ३४ वर्षांची आहे. तिने एकदिवसीय सामन्यात ११२ आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ९३ विकेट्स घेतल्या आहेत. हे तीन अनुभवी खेळाडू वर्ल्डकप ट्रॉफीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत.
दक्षिण आफ्रिकेलाही गतवर्षीच्या अडचणींवर मात करून विजेतेपद मिळवायचे आहे. गतवर्षी घरच्या मैदानावर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. दक्षिण आफ्रिकेने सध्याच्या स्पर्धेत खेळाच्या प्रत्येक विभागात चमकदार कामगिरी केली आहे. लॉरा वॉलवॉर्ट (१९० धावा) आणि ताजमिन ब्रिट्स (१७० धावा) या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये आहेत. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर ८ विकेट्सनी शानदार विजय मिळवल्यामुळे संघाचे मनोबल लक्षणीयरित्या उंचावले असेल.
दक्षिण आफ्रिकेचा संघ वॉलवॉर्ट आणि ब्रिट्स या जोडीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असेल. मात्र, या जोडीला अनेके बॉश आणि मारिझान कॅप या खेळाडूंच्या पाठिंब्याचीही गरज असेल. गोलंदाजीत, नॉनकुलुलेको मलाबा (१० विकेट) यांनाही उपांत्य फेरीतील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी उर्वरित गोलंदाजांच्या मदतीची आवश्यकता असेल.
न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास.
दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ताजमिन ब्रिट्झ, एनेके बॉश, क्लो ट्रायॉन, मारिझान कॅप, सुने लुस, नादिन डी क्लर्क, अँरी डर्कसेन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), नॉनकुलुलेको मलाबा, अयाबोंगा खाका.