महिला टी-20 विश्वचषक २०२४ चे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आता सर्व सामने बांगलादेशऐवजी यूएईमध्ये खेळवले जातील. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा पहिला सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना ४ ऑक्टोबरला दुबईत होणार आहे. याआधी भारतीय संघ २ सराव सामनेही खेळणार आहे. या स्पर्धेचे आयोजन ३ ऑक्टोबरपासून होणार आहे.
तर बहुप्रतिक्षित भारत आणि पाकिस्तान सामना ६ ऑक्टोबर रोजी दुबईत होणार आहे.
महिला टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी दोन गट तयार करण्यात आले आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांना अ गटात ठेवण्यात आले आहे.
तर ब गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलंड यांना ठेवण्यात आले आहे.
महिला T20 विश्वचषक २०२४ चा पहिला सामना बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यात होणार आहे. हा सामना ३ ऑक्टोबरला शारजाहमध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. हा सामना ३ ऑक्टोबरलाच होणार आहे. या स्पर्धेचे सर्व सामने आता दुबई आणि शारजाह येथे होणार आहेत. या स्पर्धेत १० संघ एकमेकांना भिडणार आहेत.
महिला टी-20 वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत एकूण २३ सामने खेळवले जाणार आहेत. सर्व संघ ४-४ गट सामने खेळतील. दोन्ही गटातील टॉप-२ संघ उपांत्य फेरीत भिडतील. पहिला उपांत्य सामना १७ ऑक्टोबरला दुबईत तर दुसरा उपांत्य सामना १८ ऑक्टोबरला शारजाहमध्ये खेळवला जाईल.
दोन्ही उपांत्य फेरीतील विजेते संघ अंतिम फेरीत विजेतेपदासाठी झुंजतील. २० ऑक्टोबर रोजी दुबईत अंतिम सामना होणार आहे. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस आहे. जर भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला तर तो पहिला उपांत्य सामना खेळेल.
अ गट: ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका
ब गट: दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, स्कॉटलंड
४ ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
६ ऑक्टोबर- भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
९ ऑक्टोबर- भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई
१३ ऑक्टोबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजा