ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात आज (१० फेब्रुवारी) वनडे मालिकेतील निर्णायक सामना खेळला गेला. या सामन्यात एक विचित्र घटना घडली.
या सामन्यातील एकाच चेंडूवर सिक्स, विकेट, एक्स्ट्रा बॉल, एक्स्ट्रा रन, नो बॉल अशा गोष्टी पाहायला मिळाल्या.
क्रिकेटमध्ये अशी विचित्र घटना यापूर्वी कधीच घडली नव्हती. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
वास्तविक, आज ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलियाच्या डावात ही विचित्र घटना घडली. ४८व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ही घटना पाहायला मिळाली.
त्यावेळी ऑस्ट्रेलियाची अलाना किंग स्ट्राईकवर होती आणि दक्षिण आफ्रिकेची मसाबता क्लास गोलंदाजी करत होती. मसाबताने शेवटचा चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू हातातून निसटला आणि कमरेच्या वर फुलटॉस पडला. या चेंडूवर अलाना किंगने जोरदार फटका मारला. हा चेंडू थेट प्रेक्षकांमध्ये षटकार गेला. पण यादरम्यान अलाना किंगचा तोल जाऊन ती स्टंपवर कोसळली आणि हिट विकेट झाली.
यामुळे अलाना किंग पूर्णपणे निराश झाली, कारण तिला वाटले, चेंडू षटकारासाठी गेला आणि ती हिट विकेट झाली पण नंतर मैदानावरील पंचांनी नो बॉलचा इशारा दिला.
पंचांचा इशारा किंगच्या लक्षात आल्यावर ती खुश झाली. कारण ऑस्ट्रेलियाला एका चेंडूवर ७ धावा मिळाल्या. अशा प्रकारे, मसाबता क्लासच्या त्या एकाच चेंडूवर चाहत्यांना सर्व काही पाहायला मिळाले.
दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ९ विकेट गमावत २७७ धावा केल्या. बेथ मुनीने सर्वाधिक ८२ धावांची खेळी खेळली. कर्णधार ॲलिसा हिलीने ६० धावा केल्या. ताहलिया मॅकग्राने ४४ धावांची खेळी केली.
लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने ४ विकेट गमावून ६३ धावा केल्या होत्या. तेव्हा पाऊस आला आणि सामना थांबवावा लागला. सामना पुन्हा सुरू झाला तेव्हा आफ्रिकेला ३१ षटकांत २३८ धावांचे लक्ष्य देण्यात आले. पण आफ्रिकेचा संपूर्ण संघ २४.३ षटकांत १२७ धावा करून सर्वबाद झाला.