भारतीय क्रिकेट संघाची युवा आणि उदयोन्मुख खेळाडू पूजा वस्त्राकर सोशल मीडियावर एका पोस्टमुळे चर्चेचा विषय बनली आहे. अलीकडेच, इन्स्टाग्रामवर एक स्टोरी अपडेट करताना तिने एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक बडे नेते दिसत आहेत.
आता या पोस्टच्या कॅप्शनमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या फोटोत भाजपचे एकूण ११ मंत्री दिसत आहेत, ज्यांना आयपीएल फ्रँचायझी गुजरात टायटन्सच्या जर्सीमध्ये दाखवण्यात आले आहे आणि फोटोवर वसूली टायटन्स असे नाव लिहिण्यात आले आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होताच पूजा वस्त्राकरने ही पोस्ट डिलीट केली.
पूजा वस्त्राकरने पोस्ट डिलीट केली असली तरी नेटकऱ्यांनी घेतलेले स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. पूजाने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोर्टात दिलेल्या वक्तव्याच्या एका दिवसानंतर ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
केजरीवाल यांनी त्यांच्या वक्तव्यात म्हटले होते की, केंद्रीय एजन्सीचा तपास टाळण्यासाठी भाजपने निवडणूक रोख्यांच्या (इलेक्टोराल बॉन्ड) स्वरूपात 'वसूली रॅकेट' सुरू केले आहे.
पूजा वस्त्राकरने केलेल्या पोस्टवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्सनी पूजाची टिंगल करत तिला काँग्रेस समर्थक म्हटले, तर काहींनी अशी पोस्ट शेअर केल्याने अडचणीला सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही दिला.
या संपूर्ण प्रकरणानंतर पूजा वस्त्राकरने इंस्टाग्रामवर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने स्पष्टीकरण देत लिहिले, की "माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक अतिशय आक्षेपार्ह पोस्ट शेअर करण्यात आल्याचे मला कळले आहे. ही पोस्ट तेव्हा पोस्ट करण्यात आली जेव्हा मी माझा मोबाईल फोन वापरत नव्हते. मी माननीय पंतप्रधानांचा खूप आदर करते. यामुळे कोणाचे नुकसान झाले असेल तर मी त्याबद्दल माफी मागते."