IPL 2025: मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या फ्रंचायझीचा महत्त्वाचा खेळाडू आहे. परंतु, या वर्षाच्या अखेरिस होणाऱ्या आयपीएलच्या मेगालिलावात काय होईल, हे कुणालाच ठाऊक नाही. आयपीएल २०२४ पूर्वी रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्यात आले. यामुळे रोहित शर्मा पुढच्या वर्षी मुंबईच्या संघाची साथ सोडू शकतो, असे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूने रोहितला चेन्नई सुपर किंग्जकडून खेळण्याचा सल्ला दिला होता. रोहित दिल्ली कॅपिटल्समध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी शक्यता त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केली. यातच लखनौ सुपर जायंट्सचा संघ रोहित शर्माला संघात सामील करून घेण्यासाठी इच्छुक आहे.
आयपीएलचा मेगा लिलाव या वर्षाच्या अखेरीस डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या १६ तारखेला सर्व १० फ्रँचायझींच्या मालकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचा म्हणजे, फ्रंचायझीसमोर कोणत्या खेळाडूला संघात कायम ठेवायचे आहे आणि कोणत्या खेळाडूला रिलीज करण्याचे आव्हान असेल. २०२२ मध्ये झालेल्या शेवटच्या मेगा लिलावापूर्वी फ्रँचायझींना एका राईट टू मॅच कार्डसह जास्तीत जास्त ४ खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. तथापि, आरटीएम फॅक्टरमुळे फ्रँचायझी स्थिरता शोधत आहेत. ज्यामुळे त्यांना चारपेक्षा जास्त खेळाडूंना कायम ठेवण्याची मोकळीक मिळू शकते.
मुंबई इंडियन्स फ्रंचायझी कर्णधार हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादवला संघात कायम ठेवणार, हे जवळपास निश्चित आहे. चौथ्या खेळाडूचे नाव काळानुसार निश्चित केले जाऊ शकते. रोहितच्या नेतृत्त्वाखाली मुंबईच्या संघाने पाच ट्रॉफी जिंकल्या आहेत. परंतु, यंदाच्या मेगा लिलावात फ्रंचायझी रोहित शर्माला संघात कायम ठेवते की नाही? हे पाहावे लागेल. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यातील मतभेदाच्या अफवांना पूर्णविराम मिळाला. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या अनेकदा एकमेकांना मिठी मारल्याची दृश्ये समोर आली आहेत.
रोहित शर्मा गेल्या काही हंगामापासून फॉर्मसाठी संघर्ष करीत आहे. आयपीएल २०२२ सांख्यिकीयदृष्ट्या त्याचा सर्वात वाईट हंगाम होता. या हंगामात त्याने २६८ धावा केल्या. गेल्या वर्षीही त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. आयपीएलच्या मागच्या हंगामात त्याला ३३२ धावा करता आल्या. मुंबई इंडियन्सने २०२२ नंतर आयपीएल जिंकली नसल्यामुळे व्यवस्थापनाला वाटले की, संघात बदल करणे आवश्यक आहे आणि म्हणूनच गुजरात टायटन्सला सलग दोन विजेतेपद मिळवून देणाऱ्या हार्दिकला मुंबईचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले.