टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खूप जूने आणि घट्ट नाते आहे. दोघांनी एकमेकांना बनवल्याचे मानले जाते. मुंबई इंडियन्सने जसप्रीत बुमराहला व्यासपीठ दिले. तर बुमराहनेही मुंबईला जेतेपदं मिळवून देण्यात सर्वात मोठी भूमिका बजावली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार होत असताना बुमराहने मुंबई इंडियन्सच्या यशासाठी नेहमीच एक्स फॅक्टरची भूमिका बजावली. मात्र, गेल्या मोसमात संघाचा कर्णधार बदलानंतर मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या सातत्याने येत होत्या.
अशातच आता, माजी क्रिकेटर हरभजन सिंग याच्या एका ट्विटमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
आयपीएल २०२५ च्या रिटेन्शन पॉलिसीच्या घोषणेनंतर, हरभजन सिंगने एक ट्विट केले. त्याने X वर लिहिले, की जसप्रीत बुमराहने स्वतःला आयपीएल लिलावासाठी उपलब्ध करून दिले तर आपल्याला सर्वात महागडा खेळाडू मिळेल.
तुम्हा सर्वांना हे मान्य आहे का? त्याने बुमराहलाही हे ट्वीट टॅग केले. त्याची ही पोस्ट काही वेळातच व्हायरल होऊ लागली.
जसप्रीत बुमराहने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, मात्र तो लिलावात सहभागी आणि आयपीएल ऑक्शनच्या इतिहासातील सर्व विक्रम मोडीत निघाले नवल वाटणार नाही.
दरम्यान आता भज्जीच्या ट्वीटवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
पण बुमराह आयपीएल लिलावात उतरतो की नाही, हे ३१ ऑक्टोबरपर्यंत कळेल. कारण रिटेन खेळाडूंची नावे देण्यासाठी ३१ ऑक्टोबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.
दुसरीकडे, मुंबई इंडियन्स संघ जसप्रीत बुमराहला सोडण्याचा धोका पत्करू इच्छित नाही. एकटा बुमराह संपूर्ण संघाला पुरून उरतो. २०२४ च्या T20 विश्वचषकात त्याने काय केले हे सर्वांनाच माहीत आहे.
जसप्रीत बुमराहची एन्ट्री २०१३ मध्ये झाली होती आणि त्याच वर्षी फ्रँचायझीने विजेतेपद पटकावले होते. बुमराहने आतापर्यंत १३३ सामन्यात १६५ विकेट्स घेतल्या आहेत. १० धावांत ५ बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. जगातील जवळपास प्रत्येक फलंदाज त्याला सर्वात धोकादायक गोलंदाज मानतो यावरून त्याच्या किलर बॉलिंगचा अंदाज लावता येतो.