दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये टी-20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने आफ्रिकेचा पराभव केला. एकवेळ दक्षिण आफ्रिका हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण शेवटच्या क्षणी वेस्ट इंडिजने बाजी पालटली.
दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या ३६ चेंडूत ५० धावा हव्या होत्या आणि ६ विकेट शिल्लक होत्या. परंतु दक्षिण आफ्रिकेने एकामागून एक ७ विकेट गमावल्या आणि उर्वरित संघ अवघ्या २० धावांत गारद झाला.
अशाप्रकारे वेस्ट इंडिजने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना ६ गडी गमावून १७९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ १९.४ षटकांत १४९ धावांत सर्वबाद झाला.
शेमार जोसेफ आणि रोमारियो शेफर्डने प्रत्येकी ३ बळी घेतले. आता मालिकेतील शेवटचा सामना या मैदानावर २८ ऑगस्ट रोजी होणार आहे.
तत्पूर्वी, ब्रायन लारा स्टेडियमवर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या वेस्ट इंडिजने दमदार सुरुवात केली. त्यांच्याकडून सलामीवीर अलेक अथनाजे (२१ चेंडूत २८) आणि शाई होप यांनी पहिल्या विकेटसाठी ३४ चेंडूत ४१ धावा जोडून संघाला चांगली सुरुवात करून दिली. होपने २२ चेंडूंत दोन चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४१ धावांची जलद खेळी केली.
नवव्या षटकात पॅट्रिक क्रुगरचा बळी ठरल्याने होपचे मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक हुकले. रोस्टन चेस (१५ चेंडूत ७ धावा) आणि धोकादायक निकोलस पूरन (१९ पैकी १९) यांना यावेळी विशेष काही करता आले नाही. कर्णधार रोव्हमन पॉवेल (२२ चेंडूत ३५ ) आणि शेरफेन रदरफोर्ड (१८ चेंडूत २९) यांच्या महत्त्वपूर्ण खेळीमुळे वेस्ट इंडिजने ६ बाद १७९ पर्यंत मजल मारली.
यानंतर धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा सलामीवीर रीझा हेंड्रिक्सची स्फोटक सुरुवात व्यर्थ गेली, लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली आणि रीझा हेंड्रिक्सने (१८ चेंडूत ४४) वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर चौफेर हल्ला चढवला. त्याने रायन रिकेल्टन (१३ चेंडूत २०) सोबत पहिल्या विकेटसाठी २८ चेंडूत ६३ धावा जोडल्या.
शेमार जोसेफने पाचव्या षटकात रिकेल्टनला बाद करून ही भागीदारी मोडली. पुढच्याच षटकात रोमारियो शेफर्डने हेंड्रिक्सचे स्टंप उखडून मोठा धक्का दिला.
कर्णधार एडन मार्कराम (९ चेंडूत १९ धावा) देखील वेगवान गोलंदाजाच्या जाळ्यात अडकला आणि पाहुण्या संघाची धावसंख्या ७.२ षटकांनंतर ३ बाद ८६ अशी झाली. यानंतर अकिल हुसेनने युवा फलंदाज ट्रिस्टन स्टब्सला २८ धावांच्या पुढे जाऊ दिले नाही. येथून दक्षिण आफ्रिकेला पुनरागमन करता आले नाही आणि त्यांचा संघ १९.४ षटकांत १४९ धावांत सर्वबाद झालाे.