West Indies vs Papua New Guinea Scorecard : टी-20 वर्ल्डकप २०२४ च्या दुसऱ्या सामन्यात यजमान वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यू गिनी आमनेसामने आहेत. उभय संघांमधील हा सामना गयानाच्या प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
यानंतर पापुआ न्यू गिनी संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ८ बाद १३६ धावा केल्या. आता वेस्ट इंडिजला सामना जिंकण्यासाठी १३७ धावा करायच्या आहेत.
पापुआ न्यू गिनीकडून सेसे बाऊने सर्वाधिक ५० धावांची खेळी खेळली. बाऊने ४३ चेंडूंच्या खेळीत ६ चौकार आणि १ षटकार लगावला. यष्टिरक्षक फलंदाज किलपिन डोरिगानेही १८ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने नाबाद २८ धावा केल्या. कर्णधार असद वाला (२१) आणि चाड सोपर (१०) यांनाही दुहेरी आकडा गाठण्यात यश आले.
वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफ आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी २ गडी बाद केले. तर अकिल हुसेन, रोमॅरियो शेफर्ड आणि गुडाकेश मोती यांनी १-१ विकेट घेतली.
खराब सुरुवातीनंतर पापुआ न्यू गिनीच्या फलंदाजांनी संघर्ष केला आणि त्यांना सन्मानजनक धावसंख्या गाठण्यात यश आले. खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना खूप मदत करत असली तरी वेगवान गोलंदाजांनी सर्वाधिक बळी घेतले. वेस्ट इंडिजच्या फिरकीपटूंना मिळून २ बळी घेता आले, तर वेगवान गोलंदाजांनी एकूण ५ बळी घेतले.
नाणेफेक हरल्यानंतर पापुआ न्यू गिनीला प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पीएनजी संघाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांचे ७ धावांतच २ महत्त्वाचे विकेट पडले होते. त्यानंतर कर्णधार असद वालाने क्रीजवर टिकून राहण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण पॉवरप्ले ओव्हर्सच्या शेवटच्या चेंडूवर तो २२ धावांत २१ धावा काढून तो बाद झाला. पहिल्या ६ षटकात संघाने ३ गडी गमावून ३४ धावा केल्या होत्या.
या दरम्यान, सेसे बाऊ आणि चार्ल्स अमिनी यांच्यात ४४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली, मात्र १५ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चार्ल्स बाद झाला. १७ व्या षटकात सेसे बाऊ देखील ५० धावांवर क्लीन बोल्ड झाला, तेव्हा परिस्थिती अजून सुधारली नव्हती. मात्र, पुढच्या दोन षटकांत किपलिन डोरिगा आणि चाड सोपर यांनी आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि २३ धावा केल्या.
डावाच्या शेवटच्या षटकात १४ धावा आल्या, त्यामुळे पापुआ न्यू गिनीने धावफलकावर १३६ धावा केल्या आहेत.
पापुआ न्यू गिनीचा फलंदाज सेसे बाऊने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला आहे. T20 विश्वचषकात पापुआ न्यू गिनीकडून अर्धशतक झळकावणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने ४३ चेंडूत ५० धावा केल्या.