WI vs PNG Match ICC T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकप २०२४ च्या दुसऱ्या सामन्यात यजमान वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यू गिनी आमनेसामने होते. गयानाच्या प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.
यानंतर पापुआ न्यू गिनी संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ८ बाद १३६ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने १९ व्या षटकात १३७ धावा करत सामना जिंकला.
बलाढ्य वेस्ट इंडिजला हा सामना जिंकण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागला. दुबळ्या पापुआ न्यू गिनी संघाने वेस्ट इंडिजला चांगली झुंज दिली आणि सहज सामना जिंकू दिला नाही.
पापुआ न्यू गिनीने या सामन्यात शानदार खेळ दाखवला आणि सामना रोमांचक करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. एकवेळ वेस्ट इंडिजच्या ९७ धावांवर ५ विकेट पडल्या होत्या आणि फक्त ४ षटके शिल्लक होती.
येथून रोस्टन चेस आणि आंद्रे रसेल यांनी १८ चेंडूत नाबाद ३७ धावा जोडून संघाला विजय मिळवून दिला. रोस्टन चेसने २७ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ४२ धावा केल्या. तर रसेलने ९ चेंडूत १ षटकाराच्या मदतीने १५ धावा केल्या.
ब्रँडन किंग (३४) आणि निकोलस पूरन (२७) यांनीही उपयुक्त खेळी खेळली. पापुआ न्यू गिनीकडून कर्णधार असद वालाने सर्वाधिक २ बळी घेतले.
तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पापुआ न्यू गिनी संघाने ८ विकेट्सवर १३६ धावा केल्या होत्या. पापुआ न्यू गिनीकडून सेसे बाऊने सर्वाधिक ५० धावांची खेळी खेळली. बाऊने ४३ चेंडूंच्या खेळीत ६ चौकार आणि १ षटकार लगावला. यष्टिरक्षक फलंदाज किलपिन डोरिगानेही १८ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने नाबाद २८ धावा केल्या. कर्णधार असद वाला (२१) आणि चाड सोपर (१०) यांनाही दुहेरी आकडा गाठण्यात यश आले.
वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफ आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी २ गडी बाद केले. तर अकिल हुसेन, रोमॅरियो शेफर्ड आणि गुडाकेश मोती यांनी १-१ विकेट घेतली.
संबंधित बातम्या