आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत (२२ एप्रिल) ३७ सामने झाले आहेत. आतापर्यंत झालेल्या या सामन्यांमध्ये खूप वेगाने रेकॉर्ड बनले गेले आहेत आणि मोडलेहीजात आहेत.
विशेषत: सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध एका डावात २८७ धावा करून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली. आयपीएल २०२३ पर्यंत कोणत्याही संघाने एका डावात केलेली सर्वोच्च धावसंख्या २६३ धावा होती, जी आरसीबीने २०१३ मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध केली होती. गेल्या १० वर्षांपासून हा विक्रम अबाधित होता. परंतु आयपीएल २०२४ मध्ये आता एकदा नाही तर तब्बल चार वेळा एका डावात २५० हून अधिक धावा बनल्या आहेत.
पण यंदाच्या आयपीएलमध्ये एवढ्या धावा होण्याची कारणं काय? हे आपण येथे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
बीसीसीआयने आयपीएल २०२३ मध्ये इम्पॅक्ट प्लेयर नियम सुरू केला. पण त्याचा सर्वाधिक परिणाम यंदा म्हणजेच, २०२४ मध्ये दिसून येत आहे. याचा अर्थ असा की जर एखादा संघ प्रथम फलंदाजी करत असेल तर तो ७ मुख्य फलंदाजांसह (ऑलराउंडरशिवाय) मैदानात उतरतो, कारण जेव्हा गोलंदाजी येते तेव्हा इम्पॅक्ट प्लेयर नियमानुसार, एका फलंदाजाला काढून त्याच्या जागी ५व्या गोलंदाजाला स्थान दिले जाऊ शकते.
यामुळे संघांच्या फलंदाजीत बरीच खोली आली आहे. जेव्हा संघात ७-८ पूर्णवेळ फलंदाजी करणारे खेळाडू खेळत असतात तेव्हा. सर्वच जण मोकळेपणाने फटके खेळू शकतात. SRH, KKR सह अनेक संघ या नियमाचा फायदा घेत आहेत आणि सतत २०० हून अधिक धावा करत आहेत.
आयपीएल २०२४ मध्ये, विशेषत: सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्सने अनेक प्रसंगी फलंदाजीत आक्रमकतेचे उदाहरण ठेवले आहे. त्याच वेळी, अनेक मैदानांची सीमारेषा ६० मीटर आहे. यामुळेच केकेआर आणि एसआरएचने चालू हंगामात आतापर्यंत ४-४ वेळा एका डावात २०० हून अधिक धावा केल्या आहेत.
दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही आयपीएलमध्ये गोलंदाजांना फायदा मिळवून देण्यासाठी सीमारेषा लांबवली पाहिजे, असा आवाज उठवला आहे. या कारणांमुळे मोहम्मद सिराज, ॲनरिक नॉर्खिया आणि मिचेल स्टार्क या जागतिक दर्जाच्या गोलंदाजांचीही जबरदस्त धुलाई होत आहे. हे गोलंदाज सामन्यांमध्ये १० पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा देत आहे.
कोणत्याही आयपीएल सामन्यात, प्रत्येक संघ आपल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह खेळण्याचा प्रयत्न करतो. पण प्लेइंग इलेव्हनमध्ये अशा खेळाडूंचाही समावेश आहे जे आयपीएलचा पदार्पण हंगाम खेळत आहेत किंवा त्यांना फारसा अनुभव नाही.
याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे गेराल्ड कोएत्झी, ज्याने आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत १२ विकेट घेतल्या आहेत, परंतु वेगापेक्षा इतर कोणतेही दुसरे अस्त्र त्याच्याकडे नाही. त्याने आतापर्यंत १० च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत.