suni gavaskar on shubman gill test record : टीम इंडियाचा फलंदाज शुभमन गिल कसोटी क्रिकेटमध्ये सध्या आउट ऑफ फॉर्म आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनल झाल्यापासून गिलने कसोटीत एकही अर्धशतक झळकावलेले नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटी सामन्यातही गिलची बॅट शांत राहिली. सेंच्युरियन कसोटी सामन्यात गिलला केवळ २८ धावा करता आल्या.
महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी शुभमन गिलच्या खराब फॉर्मबाबत मोठे वक्तव्य केले आहे. गावस्कर यांनी गिलच्या कसोटी क्रिकेटमधील खराब फॉर्मची कारणे सांगितली आहेत. गिल कसोटीत अधिक आक्रमकपणे खेळत आहे, असे गावस्करांचे मत आहे. कसोटी क्रिकेट हे इतर दोन फॉरमॅटपेक्षा थोडे वेगळे आहे.
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सुनील गावसकर म्हणाले की, 'मला वाटते की तो कसोटी क्रिकेटमध्ये खूप आक्रमक खेळत आहे. टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटच्या तुलनेत कसोटी क्रिकेट थोडे वेगळे आहे. फरक बॉलचा आहे. लाल चेंडू हवेत आणि पीचवर थोडा जास्त हलतो. लाल चेंडू अधिक उसळीही देतो. त्याने या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात.
गावस्कर पुढे म्हणाले, ‘शुबमन गिलने आपल्या कारकिर्दीची सुरुवात चांगली केली आणि आम्ही त्याच्या शॉट्सचे कौतुक केले. तो त्याच्या फॉर्ममध्ये परत येईल, अशी आशा आपण करू शकतो. भविष्यात तो कठोर परिश्रम करेल आणि चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे’.
गिलचा कसोटी क्रिकेटमधील फॉर्म आणि त्याच्या अलीकडच्या खेळींवर नजर टाकली, तर तो खूपच संघर्ष करत आहे. गिलचे कसोटी क्रिकेटमधील शेवटचे शतक ९ मार्च २०२३ रोजी अहमदाबाद येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाले.
त्यानंतर त्याने १३, १८, ६, १०, २९ नाबाद, २ आणि २६ धावांची खेळी खेळली. गिलला नव्या पिढीचा फलंदाज म्हटले जाते. गिलने आतापर्यंत १९ कसोटी सामन्यांत ३१.०६ च्या सरासरीने ९९४ धावा केल्या आहेत. यात २ शतके आणि ४ अर्धशतके आहेत.
संबंधित बातम्या