R Ashwin Mother Chitra Health Issue : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट येथे कसोटी सामना खेळला जात आहे. पण या सामन्यातून टीम इंडियाचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन याने अचानक माघार घेतली आहे. तो आता कसोटीचे तीन दिवस खेळणार नाही. कौटुंबिक कारणामुळे तो चेन्नईला परतला आहे.
यानंतर आता BCCI ने अश्विनबाबत नवे अपडेट दिले आहे. अश्विनची आई चित्रा यांची तब्येत खराब असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. यामुळे तो कसोटी सामन्यातून बाहेर आहे.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही याला दुजोरा दिला. राजीव शुक्ला यांनी अश्विनच्या आईच्या प्रकृतीबाबत X वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की, अश्विनच्या आईच्या प्रकृती लवकरात लवकर बरी होण्यासाठी मी कामना करतो. त्याला राजकोट कसोटी सोडून आईकडे चेन्नईला जावे लागले'.
तसेच, बीसीसीआयनेही एक प्रेस रिलीझ जारी करून म्हटले आहे, की बीसीसीआयचे सहकारी, खेळाडू आणि कर्मचारी यांचा रविचंद्रन अश्विन आणि त्याच्या कुटुंबाला पूर्ण पाठिंबा आहे. खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे'.
तत्पूर्वी, अश्विनने राजकोट कसोटीत ५०० बळींचा टप्पा पूर्ण केला. राजकोट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी (१६ फेब्रुवारी) अश्विनने जॅक क्रॉलीला आपला ५०० वा बळी बनवले. अशाप्रकारे तो कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळी घेणारा दुसरा भारतीय ठरला आहे. अश्विनच्या पुढे आता फक्त माजी फिरकीपटू अनिल कुंबळे (६१९) आहे.
अश्विनने एका बाबतीत अनिल कुंबळेचा विक्रम मोडला आहे. वास्तविक अनिल कुंबळेने ९ मार्च २००६ रोजी इंग्लंडविरुद्ध मोहाली कसोटीत ५०० बळींचा आकडा गाठला होता. त्याची ती १०५ वी कसोटी होती.
तर दुसरीकडे अश्विनला ५०० विकेट घेण्यासाठी फक्त ९८ कसोटी सामने लागले आहेत. त्याच्या पुढे फक्त श्रीलंकेचा महान गोलंदाज मुथय्या मुरलीधरन आहे. मुरलीने ८७ कसोटींमध्ये ५०० विकेट घेण्याची कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या महान शेन वॉर्नने १०८ सामने घेतले होते, तर ग्लेन मॅकग्राने त्याच्या ११० व्या कसोटीत ५०० बळींचा टप्पा गाठला होता.