भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या जागतिक क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहे. बड्याबड्या फलंदाजांना त्याचा सामना करणे अवघड जात आहे. त्याची बॉलिंग अॅक्शन अनोखी आहे, हेच त्याचे मुख्य हत्यार आहे.
बुमराह सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळत आहे. बुमराहच्या धोकादायक गोलंदाजीला सामोरे जाणे कांगारू खेळाडूंना अवघड जात आहे. मात्र, बुमराहने कसोटी क्रिकेट सोडून फक्त छोट्या फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करावे, असे मत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने व्यक्त केले आहे.
कसोटीत यश मिळवण्यासाठी अतिरिक्त वेगाची गरज असते, जी बुमराहकडे नाही, असे शोएबचे मत आहे. बुमराहने वेग वाढवला तर त्याला गंभीर दुखापतीचा धोका आहे, असे शोएबने सांगितले.
शोएब अख्तर टीएव्हीकेएस पॉडकास्टमध्ये बोलताना म्हणाला, "तो छोट्या फॉरमॅटसाठी खूप चांगला वेगवान गोलंदाज आहे. त्याला लाईन आणि लेंथ अचूक समजते. त्याची लेंथ खूप जबरदस्त आहे. डेथ ओव्हर्समध्ये त्याची गोलंदाजी खूप चांगली आहे.
तसेच, नव्या चेंडूनेही शानदार गोलंदाजी करतो. तो चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करू शकतो. पण कसोटी क्रिकेटमध्ये तुम्हाला खूप मोठे स्पेल टाकावे लागतात. तसेच, अतिरिक्त वेगाने गोलंदाजी करावी लागते.
कसोटीत फलंदाज आक्रमक फलंदाजी करत नाहीत. त्यामुळे केवळ अचूक लेंथवर गोलंदाजी करणे पुरेसे नाही. त्यासोबत सीम आणि रिव्हर्स स्विंग होत नसेल तर तुम्हाला संघर्ष करावा लागतो. अशा स्थितीत जेव्हा आपण संघर्ष करण्यास सुरवात करतो, तेव्हा टीम मॅनेजमेंटही प्रश्न विचारण्यास सुरवात करेल. मला वाटते की त्याने वनडे आणि टी-20 वर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे.
यानंतर पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजाने बुमराहच्या न्यूझीलंडविरुद्धच्या कामगिरीचा दाखला दिला, ज्यात भारतीय वेगवान गोलंदाज अधिक प्रभावी दिसला. न्यूझीलंडविरुद्धच्या घरगुती मालिकेत बुमराहला दोन सामन्यांत केवळ ३ विकेट्स घेता आल्या. न्यूझीलंडने या मालिकेत भारताला ३-० असे पराभूत केले होते.
शोएब म्हणाला, 'बुमराहला न्यूझीलंडविरुद्ध तेवढ्या विकेट्स घेता आल्या नाहीत. असे घडते. पण जर त्याला कसोटी क्रिकेट खेळत राहायचे असेल तर त्याला आपला वेग वाढवावा लागेल. वेग वाढल्याने त्याला इंज्युरी होण्याचे प्रमाणही वाढेल. जर मी जसप्रीत बुमराह असतो तर मी छोट्या फॉरमॅटमध्ये खेळलो असतो. "
संबंधित बातम्या