आयपीएलच्या (IPL 2024) सुरुवातीच्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआयने गुरुवारी (२२ फेब्रुवारी) हे वेळापत्रक जाहीर केले. पण या वेळापत्रकात एक गोष्ट पूर्णपणे वेगळी होती आणि हीच गोष्ट चाहत्यांना खटकली आहे. ती गोष्ट म्हणजे दिल्ली कॅपिटल्सचे होम ग्राउंड. होय, यंदा दिल्ली कॅपिटल्सचे होम ग्राउंड अरूण जेटली स्टेडियम नसणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ यंदा आपले सुरुवातीचे दोन होम सामने विशाखापट्टणम येथे खेळणार आहे. म्हणजेच सुरुवातीच्या दोन सामन्यांसाठी दिल्लीचे होम ग्राउंड विशाखापट्टणमचे वाय एस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियम असणार आहे. गेल्या आयपीएलपर्यंत दिल्लीचे अरुण जेटली स्टेडियम हे कॅपिटल्सचे होम ग्राउंड होते.
पण मग आता या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने त्यांचे होम ग्राउंड का बदलले? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याचेच उत्तर आम्ही तुम्हाला येथे देणार आहोत.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, WPL म्हणजेच महिला प्रीमियर लीगमुळे हा बदल झाला आहे. WPL चे सर्व २२ सामने केवळ दोन मैदानांवर खेळवले जाणार आहेत. यात बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियम आणि दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम यांचा समावेश आहे. स्पर्धेतील पहिले ११ सामने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आणि शेवटचे ११ सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जातील.
WPL 2024 २३ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान होणार आहे. अशा स्थितीत दिल्लीचे अरुण जेटली स्टेडियम पुन्हा आयपीएल सामन्यासाठी तयार करण्यास पुरेसा वेळ मिळणार नाही. यामुळे दिल्लीने विशाखापट्टणमला आपले होम ग्राउंड बनवण्याचा निर्णय घेतला.
तथापि, या रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे, की दिल्ली कॅपिटल्स त्यांचे शेवटचे ५ सामने त्यांच्या जुन्या होम ग्राउंडवर म्हणजेच अरुण जेटली स्टेडियमवर खेळेल.