IPL 2025: इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने सांगितले की, त्याने इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी मेगा लिलावासाठी नोंदणी केली आहे. ४२ वर्षीय अँडरसनने कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज म्हणून या वर्षाच्या सुरुवातीला आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपवली.
त्याने शेवटचा टी-२० सामना २०१४ मध्ये खेळला होता. तो कधीही आयपीएलमध्ये खेळलेला नाही. जेद्दाह येथे २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या लिलावासाठी त्याने नाव नोंदणी केली असून त्याची बेस प्राइस सव्वा कोटी रुपये ठेवली आहे.
अँडरसनने वर्षाच्या सुरुवातीलाच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि इंग्लंडकडून १८८ सामन्यात ७०४ बळी घेतले. यासह तो श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन (८००) आणि ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू शेन वॉर्न (७०८) यांच्यानंतर सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज ठरला.
अँडरसनने बीबीसी रेडिओ ४ टुडेला दिलेल्या पॉडकास्टमध्ये सांगितले की, ‘माझ्या आत अजूनही काहीतरी आहे, जे मला वाटते की मी अजूनही खेळू शकतो. मी कधीच आयपीएल खेळलो नाही. मी कधीही याचा अनुभव घेतला नाही आणि बऱ्याच कारणांमुळे मला वाटते की एक खेळाडू म्हणून माझ्याकडे देण्यासारखे बरेच काही आहे.’
जगातील सर्वात मोठ्या टी-२० लीगमध्ये खेळून केवळ गोलंदाज म्हणून आपले ज्ञान वाढवायचे नाही तर प्रशिक्षक म्हणून अनुभव आणि ज्ञान मिळवायचे आहे. 'या उन्हाळ्यात कारकीर्द संपल्यापासून मी थोडा प्रशिक्षक झालो आहे. मी इंग्लंड संघासोबत मार्गदर्शक म्हणूनही काम करत आहे. मला असे वाटते की, अशा लीगमध्ये खेळणे आणि त्याचा अनुभव मिळविणे कदाचित मला खेळाबद्दलचे माझे ज्ञान वाढविण्यास मदत करेल ज्याचा मला दीर्घकालीन फायदा होईल. अँडरसनने ऑगस्ट 2014 मध्ये आपल्या काउंटी संघ लँकेशायरकडून शेवटचा टी-20 सामना खेळला होता, तर इंग्लंडकडून या फॉरमॅटमध्ये त्याने शेवटचा टी-20 सामना नोव्हेंबर 2009 मध्ये खेळला होता.