विराट कोहली आणि रोहित शर्मा टी-20 विश्वचषक २०२४ नंतर एका महिन्यानंतर भारतीय संघात परतले आहेत. हे दोघेही श्रीलंका दौऱ्यावर होणाऱ्या तीन सामन्यांच्या द्विपक्षीय वनडे मालिकेसाठी संघाचा भाग आहेत. याशिवाय श्रेयस अय्यर आणि केएल राहुलचेही भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.
मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची ही पहिली एकदिवसीय मालिका आहे, ज्यातील पहिला सामना टाय झाला. पण या सामन्यानंतर एका गोष्टीने भारतीय क्रिकेट चाहत्यांना विचार करायला भाग पाडले आहे. ते म्हणजे भारतीय संघाच्या जर्सीवर ३ स्टार कसे काय होते.
भारतीय क्रिकेट संघाची नवीन जर्सी पाहून चाहते संभ्रमात पडले आहेत. या जर्सीवर तीन स्टार आहेत, तर काही दिवसांपूर्वी झालेल्या टी-20 मालिकेत दोनच स्टार्स होते. भारताने आतापर्यंत फक्त दोनदाच एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे, मग तीन स्टार्स का?
वास्तविक, हे तीन स्टार भारताच्या ३ मोठ्या स्पर्धा जिंकण्याचे प्रतीक आहेत. भारताने १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. यानंतर २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले. याशिवाय भारताने २०१३ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली होती.
या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांकाने ७५ चेंडूत ५६ धावा केल्या तर दुनित वेलालगेने ६५ चेंडूत नाबाद ६७ धावा केल्या. श्रीलंकेने ५० षटकात ८ गडी गमावून २३० धावा केल्या आणि भारताला २३१ धावांचे लक्ष्य दिले.
प्रत्युत्तरात भारतीय संघाची फलंदाजी ढासळल्याचे दिसून आले. याशिवाय केएल राहुल आणि अक्षर पटेल यांनाच ३० धावांचा टप्पा पार करता आला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत भारतीय संघाला ४७.५ षटकांत २३० धावांत गुंडाळून सामना बरोबरीत सोडवला.