भारत आणि बांगलादेश यांच्यात टी-20 मालिका रंगणार आहे. मालिकेतील पहिला टी-20 सामना रविवारी (६ ऑक्टोबर) मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे खेळवला जाणार आहे. पण हा सामना धोक्यात आला आहे. ग्वाल्हेर येथे तगडा पोलीस बंदोबस्त लाण्यात आला आहे. ग्वाल्हेरमध्ये पुढील सोमवारपर्यंत (७ ऑक्टोबर) कलम १६३ लागू करण्यात आले.
वास्तविक, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत ६ ऑक्टोबर रोजी होणारा भारत-बांगलादेश क्रिकेट सामना रद्द करण्याची मागणी केली.
शेजारील देशात हिंदूंवर होणाऱ्या 'अत्याचार' विरोधात हा निषेध करण्यात आला. आता उजव्या विचारसरणीच्या संघटनेने ६ ऑक्टोबरला ग्वाल्हेर बंदची हाक दिली आहे. अशा स्थितीत प्रशासनाने ग्वाल्हेरमध्ये पुढील सोमवारपर्यंत (७ ऑक्टोबर) कलम १६३ लागू करण्यात आले.
ग्वाल्हेरमधील क्रिकेट मैदानाभोवती आणि मैदानाच्या आत २,५०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय दोन्ही संघ ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत त्यांची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.
पीटीआयच्या माहितीनुसार, ग्वाल्हेर झोनचे पोलिस महानिरीक्षक अरविंद सक्सेना म्हणाले, "सामन्याच्या दिवशी लोक दुपारी २ नंतर रस्त्यावर उतरतील. त्यानंतर प्रेक्षक त्यांच्या घरी जाईपर्यंत पोलिस कर्मचारी त्यांचे कर्तव्य बजावत राहतील. तसेच, आदेशानुसार सुरक्षा वाढवण्यात आली असून आम्ही सोशल मीडियावरही बारीक नजर ठेवत आहोत, असे सक्सेना म्हणाले .
दरम्यान, गुरुवारी (३ ऑक्टोबर) जिल्हाधिकाऱ्यांनी निदर्शने थांबवण्याचे आदेश दिले होते. सामना कोणत्याही अडथळ्याविना पार पडावा, या उद्देशाने ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील आगामी T20 सामना ६ ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेरच्या माधवराव आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या मैदानात ३० हजार लोक बसू शकतात.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना ६ ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेरमध्ये होणार आहे. दुसरा सामना ९ ऑक्टोबरला दिल्लीत तर तिसरा सामना १२ ऑक्टोबरला हैदराबादमध्ये खेळवला जाईल. आत्तापर्यंत बांगलादेशला T20 क्रिकेटच्या इतिहासात भारताला फक्त एकदाच हरवता आले आहे.
२०१९ मध्ये दिल्लीत झालेल्या त्या सामन्यात मुशफिकर रहीमने ६० धावांची उत्कृष्ट खेळी खेळून टीम इंडियाला पराभूत करण्यात मोठे योगदान दिले होते. यावेळीही भारतीय संघाला सावध राहावे लागणार आहे.