एका वृत्तानुसार, रोहन जेटली हे बीसीसीआयचा नवे सचिव होणार आहेत, हे जवळपास निश्चित झाले आहे. ते शर्यतीत आघाडीवर आहेत. रोहन जेटली यांच्या नावावर सर्वांचे एकमत झाले आहे. अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्यासह इतर अधिकारी त्यांच्या पदावर कायम राहतील.
'दैनिक भास्कर'मधील बातमीनुसार, रोहन जेटली यांना बीसीसीआयचे सचिव बनवले जाऊ शकते. रोहन जेटली हे २०२० मध्ये प्रथमच दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (DDCA) अध्यक्ष झाले. यानंतर त्यांनी २०२१ मध्ये विकास सिंग यांचा पराभव करून दुसऱ्यांदा विजय मिळवला. जय शाह आयसीसीचे अध्यक्ष बनल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे रोहन जेटली यांना ही जबाबदारी मिळू शकते.
वास्तविक, रोहन जेटली हे भारतीय जनता पक्षाचे माजी दिग्गज नेते अरुण जेटली यांचे पुत्र आहेत. अरूण जेटली यांनी बीसीसीआयमध्ये अनेक वर्षे काम केले आणि आता रोहन हेही त्यांच्या मार्गावर जात आहेत. रोहन दोन वेळा डीडीसीएचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांना क्रीडा प्रशासक म्हणून चांगला अनुभव आहे. यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोहन यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजन करण्यात आले. त्यात ऋषभ पंत आणि इशांत शर्मासारखे मोठे खेळाडू खेळले.
बीसीसीआयचे सध्याचे सचिव जय शाह हे आयसीसीचे अध्यक्ष बनणे जवळपास निश्चित आहे. रिपोर्टनुसार, जवळपास सर्व आयसीसी सदस्य जय शाह यांच्या समर्थनात आहेत. आयसीसी बोर्डाच्या १६ पैकी १५ सदस्य जय शाह यांच्या समर्थनार्थ आहेत. जय शाह यांच्या आधी भारताच्या ४ दिग्गजांनी आयसीसी प्रमुखपद भूषवले आहे. जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर हे आयसीसीचे अध्यक्ष राहिले आहेत.