भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माबाबत निर्णय घेतला आहे. आयसीसी २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार असेल, असे जय शाह यांनी स्पष्ट केले आहे.
मात्र, टीम इंडियाला अद्याप वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित झालेले नाही.
जय शाह यांनी एका व्हिडिओ संदेशात सांगितले की, रोहित शर्मा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत दोन्ही ट्रॉफी जिंकेल, असा मला पूर्ण विश्वास आहे, असेही शाह म्हणाले. चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये खेळली जाणार आहे.
सोबतच, जय शाह पुढे म्हणाले की, “गेल्या वर्षभरातील आमची ही तिसरी फायनल होती. आम्ही जून २०२३ मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये हरलो. नोव्हेंबर २०२३ मध्ये सलग १० विजयांनंतर, आम्ही मने जिंकली, पण चषक जिंकला नाही. मी राजकोटमध्ये सांगितले होते की जून २०२४ मध्ये आम्ही चषक आणि मने जिंकू आणि भारताचा ध्वज फडकवू”.
जय शाह व्हिडिओमध्ये पुढे म्हणतात, आता पुढील स्टॉप वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. मला पूर्ण विश्वास आहे की रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आम्ही या दोन्ही स्पर्धांमध्ये चॅम्पियन बनू.
तसेच, जय शाह यांनी टी-20 विश्वचषक जिंकण्याचे श्रेय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना दिले आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने T20 विश्वचषक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. अशाप्रकारे भारतीय संघ दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक विजेता ठरला आहे. याआधी भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ चा टी-20 विश्वचषक जिंकला होता.
मात्र यानंतर जवळपास १७ वर्षे उलटून गेली तरी यश मिळाले नाही. मात्र, आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा १७ वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आला आहे.
त्याचबरोबर टी-20 विश्वचषक जिंकून भारताने ११ वर्षांपासून आयसीसी ट्रॉफी न जिंकण्याचा दुष्काळ संपवला आहे. या T20 विश्वचषकापूर्वी भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ जिंकली होती. मात्र, भारतीय संघ सातत्याने आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीपर्यंत पोहोचत होता, पण त्यांना ट्रॉफी जिंकता आली नाही.
भारतीय संघाने आपल्या मोहिमेची सुरुवात आयर्लंडविरुद्ध केली. तर दक्षिण आफ्रिकेचा विजेतेपदाच्या लढतीत पराभव झाला. भारताने स्पर्धेतील त्यांचे सर्व ८ सामने जिंकले.