आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाने एक नवा हिरा शोधून काढला आहे. या खेळाडूने आपल्या पहिल्याच आयपीएल सामन्यात चाहत्यांची मने जिंकली. त्याने चेन्नई सुपर किंग्सच्या तीन तगड्या फलंदाजांची शिकार केली. या गुणी खेळाडचे नाव विघ्नेश पुथूर असे आहे.तो केरळचा रहिवासी आहे.
२३ वर्षीय विघ्नेश पुथूर हा डावखुरा मनगटी फिरकी गोलंदाज आहे. विघ्नेशने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाड यांच्या विकेट घेतल्या. यानंतर विघ्नेश पुथूर हा चांगलाच चर्चेत आला आहे.
विघ्नेश पुथूर याला मुंबई इंडियन्सने ३० लाखांच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केले. यात सर्वात विशेष गोष्ट म्हणजे, विघ्नेशने अद्याप केरळच्या वरिष्ठ संघासाठी एकही सामना खेळलेला नाही आणि त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे.
विघ्नेश पुथूरने या सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी 'इम्पॅक्ट प्लेअर' म्हणून प्रवेश केला. येताच त्याने चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडची मौल्यवान विकेट घेतली. विघ्नेशने ऋतुराजसाठी ऑफ-स्टंपच्या फुल लेंथ चेंडू टाकला, यावर ऋतुराजने षटकार खेचण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट विल जॅकच्या हातात गेला.
यानंतर विघ्नेशने त्याच्या दुसऱ्याच षटकात शिवम दुबेला बाद केले. तोही षटकार मारण्याच्या नादात लाँगऑनवर तिलक वर्माच्या हाती झेलबाद झाला. यानंतर स्लॉग स्वीपचा प्रयत्न करताना दीपक हुड्डाही पुथूरचा बळी ठरला आणि डीप स्क्वेअर लेगवर क्षेत्ररक्षकाने त्याला झेलबाद केले.
२३ वर्षीय विघ्नेश पुथूर हा केरळमधील मलप्पुरमचा रहिवासी आहे. तो केरळकडून फक्त १४ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील स्तरावर खेळला आहे. विघ्नेश केरळ क्रिकेट लीगमध्ये अलेप्पी रिपल्सकडूनही खेळला आहे, जिथे त्याने ३वसामन्यांत फक्त २ विकेट घेतल्या.
तमिळनाडू प्रीमियर लीगमध्येही त्याने काही काळ घालवला आहे. सुरुवातीच्या काळात विघ्नेश मध्यमगती आणि फिरकी गोलंदाजी करायचा. त्यानंतर स्थानिक क्रिकेटपटू मोहम्मद शरीफ यांनी त्याला लेग स्पिन करण्याचा सल्ला दिला. त्याला 'चायनामन' माहीत नव्हते, पण तो आपल्या गोलंदाजीवर काम करत राहिला.
यानंतर तो आपल्या क्रिकेट कारकिर्दीसाठी त्रिशूरला गेला. तेथे त्याने केरळ कॉलेज प्रीमियर T20 लीगमध्ये सेंट थॉमस कॉलेजसाठी चमकदार कामगिरी केली आणि तो सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक ठरला.
जॉली रोव्हर्स क्रिकेट क्लबसाठी सातत्याने चांगली कामगिरी केल्यानंतर, त्याला केसीएलसाठी अलेप्पी रिपल्स संघात स्थान मिळाले, ज्यामुळे त्याची कारकीर्द प्रकाश झोतात आली.
विघ्नेशची स्टोरी लहान शहरातून आलेल्या आणि मोठी स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. तुमच्यात प्रतिभा असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्ही काहीही साध्य करू शकता हे त्याने दाखवून दिले आहे.
विघ्नेशचा आयपीएलमध्ये झालेला उदय मेहनतीची आणि चिकाटीची कहाणी आहे. त्याचे वडील सुनील कुमार हे ऑटो चालक आहेत आणि आई केपी बिंदू गृहिणी आहे. आर्थिक आव्हाने असूनही, त्याचे आई-वडील त्याच्या क्रिकेटच्या स्वप्नांना पाठिंबा देत राहिले.
संबंधित बातम्या