who is Vaibhav Suryavanshi : रणजी ट्रॉफीचा आजपासून नवा सीझन सुरू झाला आहे. भारतीय क्रिकेटमधील अनेक मोठी नावे मैदानात आहेत. पण सर्वात जास्त चर्चा आहे ती बिहारच्या एका युवा खेळाडूची. वैभव सूर्यवंशी असे या खेळाडूचे नाव आहे.
वैभव सुर्यवंशी याने वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. बिहारचा संघ आपल्या घरच्या मैदानावर मोईनुल हक स्टेडियमवर मुंबईविरुद्ध सामना खेळत आहे. या सामन्यात वैभवला पदार्पणाची कॅप मिळाली.
प्रथम श्रेणी पदार्पणाच्या वेळी सचिन तेंडुलकर वैभवपेक्षा वयाने मोठा होता. सचिनने १५ वर्षे २३२ दिवसांच्या वयात पदार्पण केले होते.
दरम्यान, वैभव सूर्यवंशीचे खरे वय काय, यावरून सध्या वाद सुरू आहे. बीसीसीआयच्या अधिकृत साइटनुसार, वैभवने वयाच्या १२ वर्ष, ९ महिने आणि १० दिवसांमध्ये पदार्पण केले. त्याचे हेच वय ESPNcricinfo वर देखील लिहिलेले आहे.
पण याच दरम्यान वैभवची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. ही मुलाखत ८ महिन्यांपूर्वीची आहे. यामध्ये तो स्वत: सांगत आहे की २७ सप्टेंबरला मी १४ वर्षांचा होणार आहे. त्यानुसार, पदार्पणाच्या दिवशी त्याचे वय १४ वर्षे, ३ महिने आणि ९ दिवस आहे.
वैभव सुर्यवंशी नुकताच भारताच्या अंडर-१९ ब संघाचा भाग होता. ४ देशांच्या मालिकेत भाग घेतला होता. यात इंग्लंड आणि बांगलादेशच्या युवा संघांचाही समावेश होता. त्याने ५ सामन्यात १७७ धावा केल्या. यात दोन अर्धशतकांचाही समावेश होता.
सूर्यवंशीने विनू मंकड ट्रॉफी २०२३ मध्येही चमकदार कामगिरी केली. त्याने ५ सामन्यांत ३९३ धावा केल्या. अंडर-१९ कूचबिहार ट्रॉफीमध्ये त्याने बिहारकडून खेळताना झारखंडविरुद्धच्या सामन्यात १५१ आणि ७६ धावा केल्या होत्या.
वैभव सूर्यवंशी हा डावखुरा सलामीवीर फलंदाज आहे. तो बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने वयाच्या सहाव्या वर्षी खेळ खेळण्यास सुरुवात केली आणि वयाच्या सातव्या वर्षी क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश केला. त्याने माजी रणजी क्रिकेटपटू मनीष ओझा यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे.