सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ मध्ये आज (२७ नोव्हेंबर) गुजरात आणि त्रिपुरा यांच्यात सामना झाला. या सामन्यात गुजरातने ८ विकेट्सनी विजय मिळवला. या सामन्याचा हिरो उर्विल पटेल ठरला. उर्विलने अवघ्या २८ चेंडूत शतक ठोकून खळबळ यासह २६ वर्षीय फलंदाज उर्विल पटेलने इतिहास रचला आहे. त्याने टी-20 फॉरमॅटमधील दुसरे सर्वात जलद शतक ठोकले आहे.
या फॉरमॅटमध्ये सर्वात वेगवान शतकाचा विक्रम एस्टोनियाच्या साहिल चौहानच्या नावावर आहे. त्याने २८ चेंडूत ही कामगिरी केली. सलामीला आलेल्या उर्विल पटेलने ३५ चेंडूंचा सामना करताना आणि ३२२ च्या तुफानी स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना नाबाद ११३ धावा केल्या. यादरम्यान त्याने ७ चौकार आणि १२ षटकार मारले. या तुफानी खेळीनंतर सर्व क्रिकेट चाहत्यांच्या मनात उर्विल पटेल कोण आहे? हे जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली आहे.
उर्विल पटेल कोण आहे?
उर्विल पटेलचा जन्म १७ ऑक्टोबर १९९८ रोजी गुजरातमधील मेहसाणा येथे झाला. मात्र, त्याच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. पण उर्विलने २०१७-१८ मध्ये झोनल टी-20 लीगमध्ये बडोद्याकडून टी-20 पदार्पण केले. याच्या अवघ्या महिन्याभरानंतर उर्विलने लिस्ट ए मध्ये पदार्पण केले. २०१८-१९ रणजी ट्रॉफी हंगामापूर्वी उर्विल पटेल बडोदा सोडून गुजरात संघात गेला.
उर्विल एक विकेटकीपर फलंदाज आहे. २०२३ च्या आयपीएल लिलावात त्याला गुजरात टायटन्सने २० लाख रुपयांना विकत घेतले होते. पण नुकत्याच झालेल्या IPL २०२५ च्या मेगा लिलावात उर्विल पटेल अनसोल्ड ठरला. त्याची मूळ किंमत ३० लाख रुपये होती.
उर्विल पटेल हा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ऋषभ पंतचा विक्रम उद्ध्वस्त केला आहे. याआधी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ३२ चेंडूत सर्वात जलद शतकाचा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर होता.
याशिवाय लिस्ट ए क्रिकेटमध्ये भारतासाठी दुसरे सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रमही उर्विलच्या नावावर आहे. त्याने २०२३ मध्ये अरुणाचल प्रदेशविरुद्ध ४१ चेंडूत शतक झळकावले होते.