मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  रोहित शर्माचा चौकार न देणारे अंपायर वीरेंद्र शर्मा कोण आहेत? जाणून घ्या

रोहित शर्माचा चौकार न देणारे अंपायर वीरेंद्र शर्मा कोण आहेत? जाणून घ्या

Jan 18, 2024 10:46 PM IST

Who Is Umpire Virender Sharma : मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यात रोहित शुन्यावर बाद झाला होता. अशा स्थितीत रोहित शर्माला तिसऱ्या सामन्यात पटकन एक तरी धाव करणे आवश्यक होते.

Rohit Sharma Umpire Virender Sharma
Rohit Sharma Umpire Virender Sharma

Rohit Sharma Umpire Virender Sharma : भारताने अफगाणिस्तानविरुद्धची टी-20 मालिका ३-० अशी जिंकली. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर (१७ जानेवारी) खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाबाद १२१ धावा ठोकल्या.

पण, या मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यात रोहित शुन्यावर बाद झाला होता. अशा स्थितीत रोहित शर्माला तिसऱ्या सामन्यात पटकन एक तरी धाव करणे आवश्यक होते.

रोहितने बंगळुरूत टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. यानंतर रोहित फलंदाजीस आल्यानंतर तो पहिल्या धावेच्या शोधात होता. पहिल्याच षटकात रोहितने खेळलेले दोन चेंडू त्याच्या पॅडला लागले. त्यामुळे अंपायरने त्या धावा लेगबायच्या रुपात दिल्या.

ट्रेंडिंग न्यूज

रोहितला पहिली धाव घेण्यासाठी तिसऱ्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. या दरम्यान एक मजेशीर घटना घडली. रोहितने अंपायर विरेंद्र शर्मा यांना मजेशीर अंदाजात काही प्रश्न केले.

वास्तविक, डावाच्या पहिल्याच षटकातील एक चेंडू रोहितच्या बॅटला लागून फाइन लेगच्या दिशेने चौकार गेला होता.पण अंपायर विरेंद्र शर्मा यांनी लेग बायचा इशारा केला. त्यामुळे या ४ धावा रोहित शर्माला मिळाल्या नाहीत. त्यावेळी ही गोष्ट रोहित शर्माच्या लक्षात आली नाही.

पण षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकात विरेंद्र शर्मा लेग अंपायरच्या स्थानावर गेले. तेव्हा दुसऱ्या षटकात रोहितच्या लक्षात आले की आपले खाते अद्याप उघडलेले नाही. अंपायरने तो चौकार लेग बाय रुपात दिला आहे. यानंतर रोहितने अंपायरला विचारले की, 'अरे विरू, दूसरी गेंद पर लेग बाय दिया था? इतना बडा बल्ला लगा था यार! पहले ही दो झिरो हो चुके है भाई!

रोहितचा संवाद स्टंप माइकमधून थेट टीव्हीवरील प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. सोबत कॉमेंटेटरही हा आवाज ऐकून खळखळून हसले.

अंपायर वीरेंद्र शर्मा कोण आहे?

अंपायर वीरेंद्र शर्मा हे भारताचे माजी देशांतर्गत क्रिकेटपटू आहेत. क्रिकेट कारकिर्दीनंतर वीरेंद्र शर्मा यांनी अंपायरिंग सुरू केली. विरेंद्र शर्मा यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये ५० प्रथम श्रेणी आणि ४० लिस्ट ए सामने खेळले आहेत.

वीरेंद्र शर्मा यांनी २०२१ मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरिंग केली. त्यानंतर २०२३ च्या अंडर-१९ विश्वचषकातही ते अंपायर होते. याशिवाय ते आयपीएलमध्येही अंपायरिंग करतात.

टीम इंडियाने सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील हा सामना दोन वेळा टाय झाला. सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २१२ धावा केल्या. यानंतर अफगाण संघानेही ६ बाद २१२ धावा केल्या, त्यामुळे सामना बरोबरीत सुटला.

यानंतर सुपर ओव्हर खेळली. ही सुपर ओव्हरदेखील टाय झाली. सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी १६-१६ धावा केल्या.

यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने ५ चेंडूत ११ धावा केल्या. यानंतर कर्णधार रोहित शर्माने फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईकडे गोलंदाजी सोपवली.

बिश्नोईने आपल्या फिरकीची जादू दाखवत केवळ १ रन दिला आणि अफगाणिस्तानचे दोन्ही फलंदाज बाद केले. बिश्नोईने मोहम्मद नबी आणि रहमानउल्ला गुरबाज यांना झेलबाद केले.

WhatsApp channel