टीम इंडियाचा अंडर-१९ संघ मायदेशात ऑस्ट्रेलियन अंडर-१९ संघाविरुद्ध ३ एकदिवसीय आणि दोन ४ दिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यासाठी बीसीसीआयने भारतीय अंडर-१९ संघाची घोषणा केली आहे. यामध्ये भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविड याचीही निवड करण्यात आली आहे. तर १८ वर्षांच्या मोहम्मद अमानला कर्णधार बनवण्यात आले आहे.
१८ वर्षीय मोहम्मद अमानला भारतीय अंडर-१९ वनडे क्रिकेट संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. या महिन्यात, पुद्दुचेरी येथे २१ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर दरम्यान भारत आणिऑस्ट्रेलियामध्ये ही मालिका रंगणार आहे.
उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील रहिवासी असलेल्या मोहम्मद अमानला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. अमानची आई परवीन आणि ट्रकचालक असलेले वडील मोहम्मद मेहताब यांनी त्याला क्रिकेट खेळण्यास नेहमीच पाठिंबा दिला.
पण २०२१ मध्ये त्याच्या आईचे कोरोनाने आणि २०२२ मध्ये वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. अमान त्यावेळी अवघ्य १६ वर्षांचा होता, या वयातच त्याच्या लहान भावंडांची जबाबदारी अमानवर आली. पण अमानने मोठ्या जिद्दीने आणि मेहनतीने आपला खेळ सुरूच ठेवला.
या दरम्यान, मोहम्मद अमान आपल्या खडतर जीवनाशी संघर्ष करत असताना SDCA चे अध्यक्ष मोहम्मद अक्रम यांनी मसिहा बनून मदतीचा हात पुढे केला.
मोहम्मद अक्रम यांनी अमानला सोबत ठेवले आणि त्याला एका चांगल्या अकादमीमध्ये प्रशिक्षण दिले. याचाच परिणाम म्हणजे आज मोहम्मद अमानला भारतीय अंडर-१९ क्रिकेट संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.
दरम्यान, या आनंदाच्या प्रसंगी त्याचे आई-वडील त्याच्या सोबत नसल्याने अमानला खूप वाईट वाटत आहे. कारण अमानच्या आई-वडिलांचे स्वप्न होते की एक दिवस त्यांचा मुलगा त्यांना नक्कीच चांगले दिवस दाखवेल. अमानच्या कुटुंबात मोठी बहीण नोशबा, धाकटी बहीण शीबा, भाऊ रेहमान, अयान यांचा समावेश आहे, ज्यांची जबाबदारीही अमानच्या खांद्यावर आहे.
मोहम्मद अमानची मावशी शबनम सांगते की, अमन लहानपणापासून तिच्या घरी खेळ खेळून मोठा झाला आहे. अमानला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. कुटुंबातील कोणीही त्याला क्रिकेट खेळण्यापासून रोखले नाही आणि त्याला नेहमीच पाठिंबा दिला.
मोहम्मद अमानच्या या यशावर कुटुंबीयांनी सांगितले की, हे स्वप्नासारखे वाटते आणि त्यांच्या आनंदाला सीमा नाही. मात्र त्याचे आई-वडील येथे नाहीत. हे बोलताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि ते म्हणाले की आम्ही अमानला चांगले वाढवले पण आई-वडिलांची उणीव आम्ही कधीच भरून काढू शकणार नाही."
आपल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण करून देताना अमान म्हणाला, की यूपीसीएलच्या अक्रम भाईने मला मदत केली. अक्रम भाई यांनीच माझा खेळ पाहिला. अक्रम भैय्या यांनीच मला साथ दिली आणि मला येथे पोहोचवले.
आपल्या आवडत्या खेळाडूबद्दल बोलताना अमान म्हणाला की, तंत्राच्या बाबतीत माझा आवडता क्रिकेटर एबी डीव्हिलर्स आहे. आणि एमएस धोनी कर्णधारपदासाठी आवडता खेळाडू आहे.