IND VS ENG Hyderabad test, Tom Hartley : भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला २८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताला चौथ्या डावात विजयासाठी २३१ धावा करायच्या होत्या, परंतु संपूर्ण संघ केवळ २०२ धावांवर गारद झाला. या विजयासह इंग्लंडने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्याचा हिरो पदार्पणाची कसोटी खेळणारा फिरकी गोलंदाज टॉम हार्टली ठरला. नवख्या टॉम हार्टलीसमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करली. या फिरकी गोलंदाजाने दुसऱ्या डावात भारताच्या ७ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
दरम्यान, करिअरच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडला विजय मिळवून देणारा टॉम हार्टले नेमका कोण आहे? हे तुम्हाला माहिती आहे का? येथे आपण टॉम हार्टलीच्या क्रिकेट कारकिर्दीवर एक नजर टाकणार आहोत.
टॉम हार्टलीने या सामन्यात अनेक दिग्गजांची शिकार केली. त्याने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, अक्षर पटेल, केएस भरत, रवी अश्विन आणि मोहम्मद सिराज यांना आपला बळी बनवले.
अशाप्रकारे टॉम हार्टले पदार्पणाच्या कसोटीत छाप सोडण्यात यशस्वी झाला. तसेच आगामी ४ कसोटी सामन्यांमध्ये टॉम हार्टले टीम इंडियाच्या फलंदाजांना तगडे आव्हान देऊ शकतो.
दरम्यान, पहिल्या डावात टॉम हार्टलीची कामगिरी निराशाजनक होती. पहिल्या डावात त्याने १३१ धावा दिल्या होत्या आणि केवळ २ भारतीय फलंदाजांना बाद केले होते.
यानंतर टॉम हार्टलीला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले, मात्र दुसऱ्या डावात या गोलंदाजाने शानदार गोलंदाजी केली. दुसऱ्या डावात टॉम हार्टलेने ६२ धावांत ७ बळी घेतले. अशाप्रकारे टॉम हार्टलीने पदार्पणाच्या कसोटीत ९ फलंदाजांना बाद केले.
टॉम हार्टली यांचा जन्म ३ मे १९९९ रोजी लँकेशायर येथे झाला. हा फिरकी गोलंदाज त्याच्या अचूक लाईन आणि लेंथसाठी ओळखला जातो. टॉम हार्टलीने २०२० मध्ये लँकेशायरसाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले. द हंड्रेडच्या पहिल्या सत्रात टॉम हार्टले मँचेस्टर ओरिजिनल्सकडून खेळला.
यानंतर टॉम हार्टलीला आयर्लंड दौऱ्यासाठी इंग्लंडच्या वनडे संघाचा भाग बनवण्यात आले. हा दौरा टॉम हार्टलीसाठी काही खास नव्हता, पण तरी टॉम हार्टलीला भारत दौऱ्यासाठी संघाचा भाग बनवण्यात आले.
संबंधित बातम्या