आर. अश्विनला पर्याय म्हणून पुढं आलेला तनुष कोटियन आहे कोण? बॉक्सिंग डे टेस्टमध्ये खेळण्याची शक्यता
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  आर. अश्विनला पर्याय म्हणून पुढं आलेला तनुष कोटियन आहे कोण? बॉक्सिंग डे टेस्टमध्ये खेळण्याची शक्यता

आर. अश्विनला पर्याय म्हणून पुढं आलेला तनुष कोटियन आहे कोण? बॉक्सिंग डे टेस्टमध्ये खेळण्याची शक्यता

Dec 23, 2024 07:23 PM IST

Tanush Kotian News in Marathi : आर. अश्विनच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर भारत-ऑस्ट्रेलियामधील उर्वरीत सामन्यांसाठी टीम इंडियाच्या चमूमध्ये तनुष कोटियन या मुंबईकर फिरकीपटूची निवड झाली आहे. कोण आहे हा गोलंदाज?

आर. अश्विनला पर्याय म्हणून पुढं आलेला तनुष कोटियन आहे कोण? बॉक्सिंग डे टेस्टमध्ये खेळण्याची शक्यता
आर. अश्विनला पर्याय म्हणून पुढं आलेला तनुष कोटियन आहे कोण? बॉक्सिंग डे टेस्टमध्ये खेळण्याची शक्यता

India Vs Australia : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेतील उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारतानं मुंबईचा ऑफ स्पिनर तनुष कोटियन याला संघात संधी दिली आहे. तनुष हा आर. अश्विनची जागा घेणार आहे. अक्षर पटेल यानं वैयक्तिक कारणांमुळं उपलब्ध नसल्याची माहिती बीसीसीआयला दिल्यानंतर बॅक-अप पर्याय म्हणून तनुष कोटियनचा समावेश करण्यात आला आहे. बॉक्सिंग डे कसोटीत तो खेळण्याची शक्यता आहे.

ब्रिस्बेन येथील तिसऱ्या कसोटी संपल्यानंतर आर अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. दोन सामने उरले असतानाच अश्विननं घोषणा केल्यामुळं त्याला पर्याय शोधणं भाग पडलं. २६ वर्षीय तनुष कोटियन मंगळवारी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.

कोण आहे तनुष कोटियन?

तनुष कोटियन (Tanush Kotian) हा मुंबईकर खेळाडू आहे. ऑफ स्पिनर असलेला तनुष देशांतर्गत क्रिकेट वर्तुळात एक अव्वल दर्जाचा अष्टपैलू म्हणून ओळखला जातो. अलीकडेच बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेपूर्वी भारत अ संघासोबत ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. त्याला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडचा अनुभव आहे. तिथं त्यानं भारत अ संघासाठी ८व्या क्रमांकावर फलंदाजी करताना ४४ धावांच्या चिवट खेळीनं लक्ष वेधून घेतलं होतं. कोटियन सध्या अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबई संघातून खेळत आहे. 

रणजीत ठरलाय ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’

२०२३-२४ च्या रणजी ट्रॉफीमध्ये तनुष कोटियननं चमकदार कामगिरी केली होती. त्यानं 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' हा पुरस्कार पटकावला होता. मुंबईच्या ४२व्या रणजी विजेतेपदात त्याचा मोठा वाटा होता. या स्पर्धेत त्यानं १६.९६ च्या सरासरीनं २९ बळी घेतले आणि ४१.८३ च्या सरासरीनं ५०२ धावा केल्या. यात पाच अर्धशतकं आणि एका शतकाचा समावेश आहे.

माजी ऑफस्पिनर रमेश पोवार यांच्यानंतर भारतीय राष्ट्रीय संघासाठी निवड झालेला तो पहिला मुंबईचा फिरकी गोलंदाज आहे. त्यामुळं त्याची निवड महत्त्वाची मानली जात आहे. तनुषनं २०२४ च्या मोसमात राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं आणि एकाच सामन्यात २४ धावा केल्या. त्याला आयपीएलमध्ये गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. २०२५ च्या सीझनपर्यंतच्या IPL मेगा लिलावात कोटियन अनसोल्ड राहिला.

अष्टपैलू कामगिरी

कोटियनची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आकडेवारी त्याची अष्टपैलू क्षमता दर्शवते. ३३ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्यानं ४१.२१ च्या सरासरीनं २५२३ धावा केल्या आहेत. त्यानं गोलंदाजीत २५.७० च्या सरासरीनं १०१ बळीही घेतले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळं त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळण्यात मदत झाली. 

Whats_app_banner