Karnataka vs Punjab Ranji Trophy Scorecard : रणजी ट्रॉफीच्या सहाव्या फेरीत कर्नाटक आणि पंजाब यांच्यात सामना खेळला जात आहे. बेंगळुरू येथे सुरू असलेल्या या सामन्यात कर्नाटकचा फलंदाज रविचंद्रन स्मरण याने आपल्या बॅटने ताकद दाखवली आहे.
स्मरण रवीचंद्रन याने शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील पंजाबविरुद्ध द्विशतक झळकावून त्याने खळबळ उडवून दिली आहे. स्मरणने पहिल्या डावात २७७ चेंडूत २०३ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर कर्नाटक संघाने ४७५ धावा केल्या आहेत. स्मरणच्या ६ सामन्यांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील हे पहिले शतक आणि द्विशतक आहे.
२१ वर्षीय रविचंद्रन स्मरण याने गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्येच देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता. त्याला सामन्यांचा फारसा अनुभव नाही. स्मरणने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्रिपुराविरुद्धच्या टी-20 आणि मुंबईविरुद्ध लिस्ट ए सामन्यात पदार्पण केले.
स्मरणने रणजी ट्रॉफीचा पहिला सामना मध्य प्रदेश विरुद्ध खेळला. स्मरणाला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळून जेमतेम ६ महिने झाले आहेत आणि त्याने आपल्या संघासाठी मोठी खेळी खेळली आहे.
दरम्यान, कर्नाटक आणि पंजाबमधील हा सामना २३ जानेवारीपासून सुरू झाला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात शुभमन गिलचा पंजाब संघ अवघ्या ५५ धावांत गारद झाला. यानंतर कर्नाटकचा संघ फलंदाजीसाठी उतरला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या स्मरणने देवदत्त पडिक्कलसोबत ५२ धावांची भागीदारी केली. पडिक्कल संघाच्या १११ धावा झाल्या असताना बाद झाला.
यानंतर आलेल्या एकाही फलंदाजाला अर्धशतकही करता आले नाही. पण स्मरणने छोट्या भागीदारी करत संघाची धावसंख्या वाढवत ठेवली आणि द्विशतक झळकावले. त्याच्या २०३ धावांच्या खेळीच्या जोरावर कर्नाटकने पहिल्या डावात ४७५ धावा केल्या. यासह त्याने पहिल्या डावात ४२० धावांची मोठी आघाडी घेतली.
रविचंद्रन स्मरण याने यापूर्वीही कर्नाटकसाठी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. भारताच्या देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धेच्या विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्याने उत्कृष्ट खेळी खेळली. स्मरणने शतक झळकावून आपल्या संघाला पाचव्यांदा स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले. विदर्भाविरुद्धच्या या सामन्यात त्याने ९२ चेंडूत १०१ धावा केल्या होत्या.
या खेळीच्या जोरावर कर्नाटक संघाला ३४८ धावांची मोठी मजल मारता आली आणि सामना जिंकता आला. त्याने संपूर्ण स्पर्धेत १० सामने खेळले आणि ७२ च्या सरासरीने ४४३ धावा केल्या. यात त्याने २ शतके आणि २ अर्धशतकेही झळकावली.
स्मरणला प्रथम २२ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत सीके नायडू ट्रॉफीपासून ओळख मिळाली. या स्पर्धेत त्याने ८२९ धावा केल्या आणि सर्वांच्या नजरेत आला. महाराजा टी-20 ट्रॉफीमध्येही त्याने १०४ धावांची नाबाद इनिंग खेळून खळबळ उडवून दिली होती.
त्यानंतरच त्याला कर्नाटकच्या वरिष्ठ संघात स्थान मिळाले. आत्तापर्यंत त्याने देशांतर्गत टी20 मध्ये ६ सामन्यांमध्ये ३४ च्या सरासरीने १७० धावा केल्या आहेत आणि लिस्ट ए च्या १० सामन्यांमध्ये ७२ च्या सरासरीने ४३३ धावा केल्या आहेत. तर पहिल्या ८ डावात ३४८ धावा केल्या आहेत.
संबंधित बातम्या