भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये वाढ होणार आहे. बीसीसीआयने मोठा निर्णय घेत आणखी एका फलंदाजी प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती इंग्लंड मालिकेसोबतच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी असेल.
बीसीसीआयने या कामासाठी निवडलेल्या व्यक्तीचे देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठे नाव आहे. तो भारताच्या कोचिंग स्ट्रक्चरमध्ये बऱ्याच काळापासून काम करत असून या व्यक्तीचे नाव आहे सितांशु कोटक.
सितांशु कोटक १८ जानेवारीला संघात सामील होतील. याच दिवशी संघ कोलकात्यात तीन दिवसीय शिबिर सुरू करणार आहे. या दिवशी कोटक आपल्या कामाला सुरुवात करतील. त्यांच्यासोबत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर, गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल, सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोएश्चे हे सहभागी होणार आहेत.
कोटक हे भारतीय देशांतर्गत क्रिकेटचे दिग्गज मानले जातात. त्यांनी १३० प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्यात त्यांनी ८०६१ धावा केल्या आहेत. यात त्यांची सरासरी ४१.७६ आहे. कोटक यांनी १९९२-९३ मध्ये पदार्पण केले आणि ऑक्टोबर २०१३ मध्ये शेवटचा सामना खेळला. त्यांच्या नावावर १५ शतके असून ५५ अर्धशतके आहेत.
लिस्ट-ए क्रिकेटमध्ये कोटक यांनी ८९ सामने खेळले आहेत आणि ४२.२३ च्या सरासरीने ३०८३ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्यांच्या नावावर तीन शतके आणि २६ अर्धशतके केली आहेत. दोन्ही फॉरमॅटमध्ये एकूण ११,१४४ धावा केल्या आहेत. या कामगिरीनंतरही कोटक यांना भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. ते अनेकवेळा टीम इंडियामध्ये सामील होण्याच्या शर्यतीत होते, पण ते भारतासाठी पदार्पण करू शकले नाहीत.
कोटक हे मजबूत टेक्निकसाठी ओळखले जातात. कोटक यांना भारतीय संघासोबत प्रशिक्षक म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. व्हीव्हीएस लक्ष्मणसोबत कोटक यांनी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून टीम इंडियासोबत काम केले आहे.
राहुल द्रविड कोच असताना जेव्हा विश्रांती घेत असे तेव्हा लक्ष्मण आणि त्याचे साथीदार भारतीय संघाची जात असत.
कोटक हेही दीर्घकाळ एनसीएमध्ये कार्यरत आहेत. त्याने भारत-अ आणि भारताच्या अंडर-19 संघासोबत प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. देशातील सर्वोत्तम प्रशिक्षकांमध्ये त्यांची गणना होते. कोचिंगमध्ये त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे.
संबंधित बातम्या