U19 World Cup 2024 1st Semi Final : भारतीय संघ अंडर-१९ विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. भारताने आज (६ फेब्रुवारी) सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा २ विकेट्स राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने नवव्यांदा अंडर १९ वर्ल्डकपची फायनल गाठली आहे.
यात भारत ५ वेळा चॅम्पियन बनला तर तीनदा फायनलमध्ये पराभूत झाला आहे. अंडर १९ वर्ल्डकपची फायनल ११ फेब्रुवारीला होणार आहे.
तत्पूर्वी, हा सामना खूपच रोमहर्षक झाला. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर दक्षिण आफ्रिकेने ५० षटकात २४४ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ४९व्या षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.
आफ्रिकेच्या २४५ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. भारताने अवघ्या ३२ धावांवर ४ विकेट गमावल्या होत्या. यानंतर कर्णधार उदय सहारन आणि सचिन धस यांनी शानदार १७१ धावांची भागीदारी केली. पण या दरम्यान सचिन धसचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले. तो ९६ धावा करून बाद झाला. त्याने ९५ चेंडूत ११ चौकार आणि १ षटकार मारला. तर उदयने ८६ धावांची खेळी केली.
दरम्यान, या सामन्यातील सचिन धसची खेळी खूप मोलाची होती. ११व्या षटकात ४ विकेट पडल्यानंतर सचिन आणि उदय यांनी जबाबदारीने खेळ केला. पण सचिनच्या इनिंगची खासियत म्हणजे, त्याने धावांचा वेग वाढवण्याचे काम केले. ४ विकेट लवकर गेल्याने उदय सहारनने चेंडू खेळून काढले, त्यामुळे संघावर विकेट वाचवण्यासोबतच धावा करण्याचाही दबाव होता. अशा स्थितीत सचिन धसने एकेरी-दुहेरी धावांसोबत चौकार देखील वसूल केले. त्याने त्याच्या खेळीत ९५ चेंडूत ११ चौकार आणि १ षटकार लगावला.
विशेष म्हणजे, या आधीच्या सामन्यात सचिन धसने नेपाळविरुद्ध शतकी खेळी केली होती. सचिन टीम इंडियात फिनीशर म्हणून खेळतो. त्याने संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत खूप मोलाची कामगिरी केली आहे.
वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये जबरदस्त ९६ धावा फटकावणारा सचिन धस बीडचा आहे. त्याचे वडिल संजय धस आरोग्य विभागात कार्यरत आहेत. तर, आई सुरेखा धस या पोलिस अधिकारी आहेत.
सचिनला सुरुवातीपासूनच क्रिकेटची आवड होती. त्यामुळे घरच्यांनी त्याला बीडच्याच आदर्श क्रिकेट क्लबमध्ये पाठवण्यास सुरुवात केली. यानंतर सचिनची १४ वर्षाखालील विभागीय संघात निवड झाली. यानंतर तो १४ वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या संघातदेखील खेळला आहे.