Rahul Singh Gahlaut Double Century In Ranji Trophy : आजपासून रणजी ट्रॉफीच्या नव्या (Ranji Trophy 2024) सीझनला सुरुवात झाली. नागालँड आणि हैदराबाद यांच्यातील सामना नागालँड क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात राहुल सिंग गेहलोतने जबरदस्त फलंदाजी केली. राहुल सिंह गेहलोतने १४३ चेंडूत द्विशतक झळकावले.
रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील हे दुसरे सर्वात वेगवान द्विशतक आहे. राहुलने हैदराबादसाठी २१४ धावांची खेळी खेळली. राहुलने अवघ्या १४३ चेंडूत द्विशतक पूर्ण केले. रणजी ट्रॉफी २०२४ च्या पहिल्याच दिवशी हैदराबादने ५ बाद ४७४ धावांवर डाव घोषित केला. राहुलने १५७ चेंडूत २१४ धावांच्या खेळीत २३ चौकार आणि ९ षटकार ठोकले.
रणजी ट्रॉफीत सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम रवी शास्त्रींच्या नावावर आहे. शास्त्रींनी मुंबईकडून खेळताना बडोद्याविरुद्ध केवळ १२३ चेंडूत द्विशतक झळकावले होते. हा विक्रम आज मोडेल, असे वाटत होते, पण तसे घडले नाही.
राहुल सिंग गेहगेहलोत हा हैदराबादचा डावखुरा फलंदाज आहे. त्याने २०१३ मध्ये हैदराबादसाठी लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण त्याला हैदराबादकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळत नव्हती.
राहुल सिंह गेहलोत हा भारतीय लष्कराचा भाग आहे. २०१६ मध्ये, त्याने आर्मी संघासाठी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. हैदराबादसाठी त्याला संधी मिळाली नाही तेव्हा तो आर्मी टीममध्ये सामील झाला. त्याच्या पहिल्याच रणजी मोसमात त्याने ७२.६९ च्या सरासरीने ९४५ धावा केल्या.
२८ वर्षीय राहुल सिंह भारत अ संघाचाही भाग राहिला आहे. २०१७ मध्ये, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यासाठी त्याचा भारत अ संघात समावेश करण्यात आला होता.
राहुल सिंह गेहलोत २०१७-१८ च्या मोसमात दुलीप ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाचाही भाग होता. त्या संघात सूर्यकुमार यादवशिवाय पृथ्वी शॉ आणि दिनेश कार्तिक यांचा समावेश होता.