Who Is Pratika Rawal : भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये एका नव्या स्टार खेळाडूचा उदय झाला आहे. प्रतिका रावल असे त्या खेळाडूचे नाव असून ती पदार्पणाच्या सामन्यापासून दमदार खेळाचे प्रदर्शन करत आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या आयर्लंडविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेत प्रतिका (Pratika Rawal Stats) टीम इंडियाचा भाग असून दमदार फलंदाजी करत आहे. तिने मालिकेतील पहिल्या सामन्यात ८९ धावांची इनिंग खेळून टीम इंडियाला दमदार विजय मिळवून दिला होता.
विशेष म्हणजे, २४ वर्षीय प्रतिकाने वयाच्या चौथ्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. दिल्लीची रहिवासी प्रतिका रावल हिला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सामन्यातून पदार्पण करण्याची संधी मिळाली. पदार्पणाच्या सामन्यात सलामीला खेळताना प्रतिकाने ४० धावांची दमदार खेळी केली.
यानंतर आता ऑयर्लंडविरुद्धही ती दमदार कामगिरी करत असून पुन्हा एकदा तिच्या तुफानी खेळाने चर्चेत आली आहे.
प्रतिका केवळ खेळातच नाही तर अभ्यासातही अव्वल आहे. प्रतिका रावल ही दिल्लीची रहिवासी आहे. तिने आपले प्रारंभिक शालेय शिक्षण दिल्लीतील मॉडर्न स्कूल येथून केले आणि जिझस अँड मेरी कॉलेज, दिल्ली येथून पदवी प्राप्त केली. याशिवाय प्रतिका खेळासोबतच मानसशास्त्राचाही अभ्यास करत आहे.
प्रतिका तिचा अभ्यास खूप गांभीर्याने घेते आणि तिला १२वी बोर्डाच्या परीक्षेत ९२.५ टक्के गुण मिळाले. प्रतिकाने लहान वयातच क्रिकेटमध्ये रस दाखवायला सुरुवात केली होती. तिने क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा ती अवघ्या ४ वर्षांची होती. प्रतिकाला तिचे वडील प्रदीप रावल यांनी क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
प्रतिका रावलने टीम इंडियाकडून वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केले. प्रतिकाला भारतासाठी आतापर्यंत फक्त ४ एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे, ज्यामध्ये तिने ५५.७५ च्या सरासरीने २२३ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने दोन अर्धशतकेही झळकावली आहेत. प्रतिका फलंदाजीसोबतच पार्ट टाइमर गोलंदाजही आहे आणि तिने दोन विकेट्सही घेतल्या आहेत. प्रतिका देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळते.
संबंधित बातम्या