आयपीएल २०२५ मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी (२५ नोव्हेंबर) अनकॅप्ड खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात पैशांचा वर्षाव झाला. पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्ससह अनेक संघांनी अनकॅप्ड खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे.
यामध्ये पंजाब किंग्सने दिल्लीच्या प्रियांश आर्य याच्यावर मोठी बोली लावली आहे. प्रियांश आर्य याने याच वर्षी दिल्ली प्रीमियर लीगमध्ये ४० चेंडूत शतक झळकावले होते. यानंतर त्याने सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये देखील ४० चेंडूत शतकी खेळी केली आहे.
अशा स्थितीत आयपीएल लिलावात त्याच्यावर मोठी बोली लागणार हे निश्चितच होते. आणि झालेही तसेच. अपेक्षेप्रमाणे, स्थानिक संघ म्हणजेच दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यावर पहिली बोली लावली आणि मुंबई इंडियन्सनेही त्यात उडी घेतली.
आणि यानंतर काही वेळातच ३० लाख रुपयांची मूळ किंमत असलेला हा खेळाडू १ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. येथे दिल्ली आणि पंजाबमध्ये बोलीयुद्ध झाले. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही यात उडी घेतली. दोघांनी शेवटपर्यंत बोली लावली आणि आकडा ३ कोटी ८० लाख रुपयांवर पोहोचला. ही बोली पंजाबने लावली होती.
प्रियांश आर्य या डावखुऱ्या फलंदाजाची मूळ किंमत ३० लाख रुपये होती. या वर्षाच्या सुरुवातीला दिल्ली प्रीमियर लीगमध्ये आर्याला बरीच ओळख मिळाली.
प्रियांश आर्यने दिल्ली प्रीमियर लीगमध्ये उत्तर दिल्ली स्ट्रायकर्सविरुद्धच्या सामन्यात एकाच षटकात ६ षटकार ठोकले होते. त्याने सामन्यात १० चौकार आणि १० षटकारासंह १२० धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीमुळे साऊथ दिल्लीने सुपस्टार्स संघाने ५ बाद ३०८ धावा केल्या होत्या.
आयपीएल २०२४ च्या लिलावासाठी तो निवडला गेला होता, पण त्यावेळी आर्यला कोणीही खरेदी केले नाही. पण आता पंजाबने त्याला आपल्या संघात जागा दिली आहे.
प्रियांशचा जन्म १८ जानेवारी २००१ रोजी झाला आणि सध्या त्याचे वय २३ वर्षे आहे. दिल्ली प्रीमियर लीग (DPL) मध्ये येण्यापूर्वी, या खेळाडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये २०२१ मध्ये दिल्लीसाठी पदार्पण केले होते.