श्रीलंकेत सुरू झालेल्या लंका T10 लीगमध्ये मॅच फिक्सिंगच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. याप्रकरणी गॉल मार्व्हल्स संघाचे मालक प्रेम ठक्कर यांना अटक करण्यात आली आहे. मॅच फिक्सिंगची ही घटना स्पर्धा सुरू झाल्यानंतर लगेचच उघडकीस आली.
मार्व्हल्स संघाचे मालक प्रेम ठक्कर यांना १६ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. तथापि, या घटनेचा स्पर्धेवर कोणताही परिणाम होणार नाही, तर एसएलसीने (SLC) अद्याप या प्रकरणावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
भारतीय नागरिक प्रेम ठक्कर यांना श्रीलंका स्पोर्ट्स पोलिस युनिटने २०१९ च्या क्रीडा-संबंधित गुन्हे प्रतिबंधक कायद्यान्वये अटक केली आहे, असे श्रीलंका पोलिसांनी ESPNcricinfo ला सांगितले. प्रेम ठक्कर यांना कँडी येथील हॉटेलमधून अटक करण्यात आली.
गेल्या काही वर्षांत श्रीलंका मॅच फिक्सिंगचा बालेकिल्ला बनला आहे. यामुळेच ICC लाचलुचपत प्रतिबंधक युनिट श्रीलंकेत बारीक लक्ष ठेवून आहे. या वर्षात श्रीलंकेत मॅच फिक्सिंगचे हे दुसरे मोठे प्रकरण समोर आले आहे.
त्याच वर्षी, लंका प्रीमियर लीगमधील दाम्बुला थंडर्स संघाचे सह-मालक तमीम रहमान यांना अटक करण्यात आली. फिक्सिंग प्रकरणात एका संघ मालकाला अटक होण्याची ही पहिलीच वेळ होती. आता लंका T10 लीगमध्ये प्रेम ठक्कर यांना पोलिसांनी पकडले आहे.
श्रीलंकेतील फिक्सिंगच्या घटना रोखण्यासाठी येथील सरकारनेही अनेक कठोर पावले उचलली आहेत. श्रीलंका सरकारने २०१९ मध्ये मॅच फिक्सिंगला गुन्हा म्हणून वर्गीकृत केले होते. असे करणारा श्रीलंका हा दक्षिण आशियातील पहिला देश ठरला आहे. येथील कायद्यानुसार क्रीडा क्षेत्रातील भ्रष्टाचाराशी संबंधित गुन्ह्यांसाठी वेगवेगळ्या दंडासह १० वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे.
संबंधित बातम्या