Pratika Rawal Stats: भारत आणि वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघ (IND W vs West Indies) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना २२ डिसेंबरला खेळला गेला. तर, दुसरा सामना आज खेळला जात आहे. या मालिकेतून २४ वर्षीय फलंदाज प्रतिका रावलने भारतासाठी पदार्पण केले, जिथे आपल्या फलंदाजीने सर्वांना आकर्षित केले आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ४० धावांची खेळी केल्यानंतर तिने दुसऱ्या सामन्यात ७६ धावा झळकावल्या. दरम्यान, कोण आहे प्रतिका आणि तिची आतापर्यंतची क्रिकेट कारकीर्द कशी राहिली आहे? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
प्रतिका रावलने वयाच्या दहाव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यानंतर २०२१ मध्ये ती पहिल्यांदा प्रकाशझोतात आली, जेव्हा तिने देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धेच्या एका सामन्यात १५५ चेंडूत १६१ धावांची खेळी केली आणि दिल्लीला बाद फेरीत पोहोचवले. या वर्षाच्या सुरुवातीला तिने २३ वर्षांखालील टी-२० ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात दिल्लीचे नेतृत्व केले. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी ती दुसरी खेळाडू ठरली. दिल्लीच्या वरिष्ठ संघातही तिने सहज स्थान मिळवले.
दिल्ली प्रीमियर लीगमध्ये प्रतिकाच्या सुधारित पॉवर गेमचे राज्यातील प्रशिक्षक आणि स्काउट्सने खूप कौतुक केले. यानंतर वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी तिचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताची सलामीवीर स्मृती मानधनासह डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आलेल्या प्रतिका रावलने ६९ चेंडूत ४० धावा केल्या. हा सामना भारताने २११ धावांनी जिंकून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० आघाडी घेतली. यानंतर आज खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या एकिदिवसीय सामन्यात तिने आपल्या खेळात सातत्य ठेवून ७६ धावा केल्या.
स्मृती मानधना, प्रतिका रावल, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, सायमा ठाकोर, तितास साधू, प्रिया मिश्रा, रेणुका सिंह.
वेस्ट इंडिज संघ: हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, शमाइन कॅम्पबेल (यष्टीरक्षक), डिआंड्रा डॉटिन, रशादा विल्यम्स, जैदा जेम्स, शाबिका गझनबी, आलिया ॲलन, शमिलिया कोनेल, एफी फ्लेचर, करिश्मा रामहरक.
संबंधित बातम्या