नितीश कुमार नावाची लोकं नेहमी किंगमेकरच्या भुमिकेतच असतात, मग ते क्षेत्र कोणतेही असो. राजकीय नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भारताचे सरकार स्थापन करण्यात भाजपसाठी किंगमेकरच्या भुमिकेत आहेत. तर अमेरिकन क्रिकेट संघाचा खेळाडू त्यांच्या संघासाठी किंगमेकर ठरला आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध अमेरिकेला विजय मिळवून देण्यात नितीश कुमारने मोलाचे योगदान दिले.
अशा स्थितीत दोन्ही नितीश कुमार सध्या प्रचंड चर्चेत आहेत. तसेच, सोशल मीडियावर मजेशीर मीम्स बनत आहेत.
टी-20 वर्ल्डकप २०२४ चा ११ वा सामना गुरुवारी (६ जून) अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला.
तत्पूर्वी, या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अमेरिकेनेही १५९ धावाच केल्या. पाकिस्तानच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नितीश कुमारने १४ चेंडूत १४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली, ज्यामुळे अमेरिकेला सामना बरोबरीत सोडवता आला.
त्यानंतर नितीशने सुपर ओव्हरमध्ये इफ्तिकार अहमदचा अवघड झेल घेतला. यामुळे धोकादायक फलंदाज इफ्तिकार बाद झाला आणि तो चेंडू निर्धाव ठरला.
नितीशने या सामन्यात कमाल केली, त्यानंतर क्रिकेटर नितीश कुमारचे नाव राजकीय नेते नितीश कुमार यांच्याशी जोडले जाऊ लागले.
यानंतर वीरेंद्र सेहवागचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्याने क्रिकबझवर म्हटले होते की नितीश कुमार शिवाय कोणताच संघ तयार होऊ शकत नाही. आता वीरूचा अंदाजही खरा ठरला.
नितीश कुमारचा जन्म कॅनडातील स्कारबोरो, ओंटारियो येथे झाला. त्याने कॅनडासाठीही क्रिकेट खेळले आहे. पण तो आता अमेरिककेडून खेळत आहे. त्याच्या क्रिकेट प्रवासाला २०१० मध्ये कॅनडाकडून १५ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील विश्वचषक पात्रता स्पर्धांमध्ये खेळताना सुरुवात झाली.
कॅनडाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा नितीश हा सर्वात तरुण खेळाडू आहे. तो २००९ मध्ये केनियाविरुद्ध खेळला आणि कॅनडासाठी एकदिवसीय सामन्यात खेळणारा तो दुसरा सर्वात तरुण खेळाडू आहे.
२०११ मध्ये जेव्हा कॅनडा एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र ठरला, तेव्हा नितीशने इतिहास रचला. वर्ल्डकप खेळणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला. पात्रता टप्प्यात तो कॅनडाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता, त्याने २ शतकांसह ३७० धावा केल्या. त्या स्पर्धेत त्याने ८ विकेट्सही घेतल्या होत्या.
यानंतर २०१४ च्या टी-20 विश्वचषक पात्रता फेरीतही तो संघाचा भाग होता. १ जून २०२४ रोजी, वयाच्या ३० व्या वर्षी, नितीश दोन देशांसाठी T20 विश्वचषक खेळणारा पहिला खेळाडू ठरला.
दरम्यान, बिहार किंवा सीएम नितीश कुमार यांच्याशी त्याचा काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
संबंधित बातम्या